Join us  

मायक्रोवेव्हमध्ये कधीच गरम करु नयेत अशा ५ गोष्टी, शेफ पंकज भदौरीया सांगतात त्यातला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 5:36 PM

5 Things you should never put in the Microwave Oven : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया ५ गोष्टींची यादी देतात, त्या कोणत्या पाहूया...

मायक्रोवेव्ह ओव्हन ही आता प्रत्येक घरातली एक अतिशय अत्यावश्यक वस्तूंपैकी एक वस्तू झाली आहे. मिक्सर, फ्रिज ही उपकरणे ज्याप्रमाणे आपल्या स्वयंपाकघराचा एक भाग बनली त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात मायक्रोवेव्ह ओव्हन मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. एखादा पदार्थ बनवण्यापासून ते जेवताना पदार्थ गरम करुन घेण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी सर्रास मायक्रोवेव्हचा वापर होऊ लागला. बेकींग, ग्रील यांसारख्या गोष्टी यामध्ये करणे सोपे झाल्याने महिलावर्गाचा बराच ताण वाचला. अगदी काही सेकंदांत गोष्टी भाजल्या किंवा शिजल्या जात असल्याने ओव्हन ही गरजेची वस्तू झाली. असे असले तरी ओव्हनमध्ये कोणत्या गोष्टी गरम कराव्यात आणि कोणत्या करु नयेत याचे काही नियम आहेत. आरोग्याच्यादृष्टीने हे नियम समजून घेणे आवश्यक आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया ५ गोष्टींची यादी देतात, त्या कोणत्या पाहूया (5 Things you should never put in the Microwave Oven)...

१. अंडी

अंडी उकडायची असतील तर आपण ती सालासकट उकडतो. मात्र अशाप्रकारे अंडी थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास या सालांमुळे एकदम स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी गॅसवरच उकडायला हवीत. 

(Image : Google)

२. अॅल्युमिनिअम फॉईल

अनेकदा आपण बाहेरुन अन्नपदार्थ ऑर्डर करतो आणि घाईघाईत अॅल्युमिनिअम फॉईलसहीतच ते गरम करायला ठेवतो. पण या फॉईलमुळे ओव्हनमध्ये आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉईल पेपर कधीच ओव्हनमध्ये ठेवू नये.

३. फ्रोजन फ्रूटस

स्ट्रॉबेरी, बेरीज यांसारखी फळे आपण काहीवेळा फ्रिजरमध्ये ठेवून टिकवतो. मात्र आपल्याला एखादा पदार्थ करायचा असेल किंवा ही फळे खायची असतील तर ही फळे रुम टेंप्रेचरला यावीत यासाठी आपण ती ओव्हनमध्ये गरम करतो. मात्र असे केल्याने ही फळे खराब होण्याची जास्त शक्यता असते.

 

४. स्टायरोफोम कंटेनर

आपले डबे हे काहीवेळा स्टायरोफोम या मटेरीयलचे असतात. आपल्याला त्याबाबत माहिती नसते. मात्र मायक्रोवेव्ह सेफ म्हणून आपण हे डबे ओव्हनमध्ये ठेवतो. पण या डब्यांतील केमिकल्स अन्नात जातात आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे डबे ओव्हनमध्ये ठेवणे टाळावे. 

५. फ्रोजन मीट

मांसाहारी पदार्थ आपण बरेचदा डीफ्रोज करतो. मग ते बनवण्यासाठी बाहेर काढल्यावर सामान्य तापमानाला येण्यास वेळ लागतो. अशावेळी घाई असल्याने आपण ते ओव्हनमध्ये गरम करतो. मात्र असे करणे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे लक्षात घ्यायला हवे.    

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.