घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर आणि किचनमधील भांडीकुंडी ही महिलांची शस्त्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यासाठी महिलांना साथ देतात ती त्यांच्या स्वयंपाक घरातील भांडीकुंडी. पूर्वीच्या काळी स्वयंपाक घरात अगदी मोजकीच भांडी असायची. परंतु आता बदलत्या काळानुसार आपण आपल्या किचनला शोभा देतील अशी अनेक भांडी घेतो. कधी कधी गरज नसताना सुद्धा भांड्यांचा आकार, रंग आवडला म्हणून किंवा हे माझ्या किचनमध्ये उठून दिसेल हा विचार करून भांडी खरेदी करतो. अश्यावेळी ही अनावश्यक भांडी घरात पडून राहतात. किचनमधील सूरी किंवा चाकू हे आकारमानाने सगळ्यात लहान असले तरी किचनमधील त्यांचं महत्व खूप आहे. कित्येकदा आपल्याकडे सुरीचे अनेक प्रकार असतात. परंतु या धारदार वस्तूंची स्वच्छता कशी राखावी असा मोठा प्रश्न पडतो. यासाठी काही खास टीप्स.(5 Tips for Kitchen Knife Cleaning).
किचनमधील धारदार वस्तूंची स्वच्छता कशी राखावी ?
१. हट्टी डागांसाठी - जर तुमच्या चाकू - किंवा सुरीवर काळे व हट्टी डाग पडले असतील तर ते साफ करण्यासाठी गरम पाणी आणि लिक्विड सोपच्या मिश्रणात चाकू किंवा सूरी काही काळासाठी ठेवा. त्यानंतर टूथब्रशच्या साहाय्याने हे काळे हट्टी डाग स्वच्छ करून घ्या.
२. ऑयलिंग करणे - किचनमधील धारदार वस्तू जर जास्त काळ वापरायच्या असतील तर तेवढीच त्यांची काळजी पण घेतली पाहिजे. प्रत्येक आठवड्यातून एकदा किचनमधील चाकू - सूरी स्वच्छ धुवून संपूर्ण कोरड्या करून त्यांच्या पात्यांना तेल लावून ऑयलिंग करून घ्या.
३. बेकिंग सोडा - चाकू - सूरी यांच्या धारदार पाती अल्युमिनियम, लोखंड किंवा स्टीलपासून बनविलेल्या असतात. लोखंडाच्या पातींवर काही ठराविक काळानंतर गंज चढू शकतो. हा गंज काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची एकत्रित पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्या गंजलेल्या भागावर लावा आणि स्क्रबरच्या मदतीने घासून हा गंज काढून घ्या.
४. स्पंजचा वापर - किचनमधील चाकू - सूरी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घासण्या येतात त्या न वापरता मऊ स्पंजचा वापर करावा. या अल्युमिनियम पासून बनलेल्या घासण्याने घासताना त्यांची धार वारंवार कमी होऊ शकते. यामुळे मऊ स्पंज वापरणे उत्तम.
५. लिंबाचा रस - जर तुमच्या सुरीवर काळे - चिकट डाग पडले असतील तर लिंबाचा रस पाण्यात मिक्स करून त्याचे पातळसर द्रावण तयार करा. लिंबाचा रस व पाणी यांचे प्रमाण १:५ असे असावे. या द्रावणात चाकू किंवा सूरी अर्ध्या तासासाठी ठेवून द्या मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.