घाईघाईत आपल्याला कुठे ऑफीसला किंवा अगदी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं तेव्हा काय घालायचं हा आपल्याला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. कपाट उघडल्यावर कपडे अंगावर पडत असतील तरी आपल्याकडे कपडेच नाहीत असं बहुतांश महिला अगदी सहज म्हणतात. त्यामागे एखाद्या कपड्याचं बटण निघालेलं असतं, एखाद्याचा रंग गेलेला असतो तर एखादा कपडा उसवलेला असतो. काही कपड्यांना इस्त्री नसल्याने विशिष्ट निमित्ताला घालण्यासाठी त्या वेळेला आपल्याकडे कपडेच नाहीत असं आपलं म्हणणं असतं. पण वेळच्या वेळी कपडे योग्य पद्धतीने ठेवले तर ऐनवेळी बाहेर जाताना आपली धावपळ होत नाही. यासाठीच कपाटात कपडे लावण्यासाठी लक्षात ठेवायला हव्यात अशा काही टिप्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे कपडेही नीट राहायला मदत होईल आणि आपल्याला हव्या त्या वेळेला हवं ते पटकन घालता येईल (5 Wardrobe Organization Tips) .
१. कपडे कपाटात लावताना
आपण कपडे इस्त्री करुन झाले किंवा धुवून झाले की ते हँगरला लावून ठेवतो किंवा कपाटात त्याच्या घड्या घालून ठेवतो. यावेळी एका शेडमधील किंवा रंगातील कपडे एकामागे एक, एकावर एक लावून ठेवावेत. म्हणजे एखादा कपडा घाईच्या वेळी शोधायचा असाल तर त्या विशिष्ट रंगाच्या ठिकाणी तो ड्रेस किंवा टॉप पटकन मिळेल.
२. वरच्या कप्प्यात किंवा माळ्यावर ठेवण्याच्या बॅग
पूर्वी आपण न लागणारे सामान मोठ्या आकाराच्या बॅगांमध्ये भरुन माळ्यावर ठेवायचो. मात्र ऐनवेळी हे सामान काढणे कठीण व्हायचे. आता कपाटांनाच तशाप्रकारचे माळे केले जातात. यामध्ये ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायजर मिळतात. त्यामध्ये आपल्याला नियमित न लागणारे भरजरी कपडे, ट्रिपला जायचे कपडे ठेवले तरी हे कपडे नीट राहतात आणि वेळच्या वेळी सापडतातही.
३. फोल्डेबल बॉक्सेस
सध्या बाजारात विविध रंगाचे, आकाराचे आणि पॅटर्नचे बरेच फोल्डेबल बॉक्सेस मिळतात. हे बॉक्स काढायला, ठेवायला अतिशय सोयीचे असल्याने आणि यात भरपूर कपडे मावत असल्याने आपण नेहमीचे कपडे ठेवायलाही त्याचा उपयोग करु शकतो. कपड्यांना धूळ लागणे किंवा कपडे विस्कटणे यासारख्या गोष्टीही यामुळे वाचू शकतात.
४. ड्रॉवर ऑर्गनायझर्स
अनेकदा आपण रुमाल, मोजे, आतले कपडे अशा लहान सहान गोष्टी इकडे तिकडे किंवा ड्रॉवरमध्ये ठेवतो. पण घाईच्या वेळेला आपल्याला जे मोजे हवेत ते सापडतच नाहीत. त्यासाठी ड्रॉवर ऑर्गनायझर्स अतिशय उपयुक्त ठरतात.
५. अॅक्सेसरी ट्रे
ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी किंवा ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवण्यासाठी बरेच अॅक्सेसरी ट्रे मिळतात. त्यामध्ये आपण आपली सौंदर्यप्रसाधने, गॉगल, घड्याळे, कानातले, सेट अशा सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने मांडून ठेवू शकतो. हे ट्रे बाहेर काढता येणारे असल्याने आपल्याला त्यांची जागा बदलायची असेल तरी ते सहज शक्य असते.