Join us  

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 2:04 PM

Laundry Tips & Hacks Everyone Needs To Know : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकताना काही गोष्टींची खबरदारी घेतली नाही तर कपडे खराब होणारच...

आजकाल नेहमीची काम झटपट आणि सोयीस्कररीत्या करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन्सचा वापर करतो. किचनमधील मिक्सर, रेफ्रिजरेटर  बाथरूममधील गिझर, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन हे सगळे मशीनचेच प्रकार आहेत. आजकाल कपडे धुण्यासाठी अनेक घरांमध्ये वॉशिंग मशिनचा वापर केला जातो. मशिनमध्ये वॉशिंग पावडर आणि कपडे घालून टायमर लावावा लागतो. मशिनमध्ये कपडे धुवून पूर्ण वाळण्यासाठी  ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. वॉशिंग मशिनमुळे कपडे हाताने धुण्याचा वेळ वाचवता येतो. आजकाल अनेकांच्या घरी कपडे धुण्याासाठी वॉशिंग मशिन असतेच. 

बरेचदा आपण जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतो, तेव्हा हे कपडे एकमेकांमध्ये गुंतून बसतात. काहीवेळा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना आपण सगळे कपडे एकदम एकावेळीच वॉशिंग मशीनमध्ये धुवायला लावतो. असे केल्याने कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत. काहीवेळा हे कपडे व्यवस्थित न धुतल्यामुळे अस्वच्छच राहतात. तसेच हे कपडे एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे फाटण्याची किंवा कापड खराब होण्याची भीती असते. अशावेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते(6 Laundry Hacks That Make Wash Day So Much Easier).

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्याआधी लक्षात ठेवा या ६ गोष्टी... 

१. चैन असणारे कपडे :- आपल्या कपड्यांपैकी काही कपड्यांना चैन असते. शर्ट, जॅकेट, पॅन्ट अशा कपड्यांना हुक्स ऐवजी चैन असते. असे चैन असणारे कपडे त्यांची चैन बंद करून मगच वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकावेत. काहीवेळेला आपण चैन उघडी ठेवूनच हे कपडे धुवायला टाकतो, त्यामुळे ही चैन वॉशिंग मशीनमध्ये अडकण्याची शक्यता असते. तसेच चैन देखील खराब होऊ शकते. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये चैन असणारे कपडे धुवायला टाकताना त्यांची चैन बंद आहे याची आधी खात्री करुन मगच ते धुवायला टाकावे. 

एकदा वापरलेला बटर पेपर फेकून न देता, पुन्हा वापरण्याची १ भन्नाट ट्रिक...

२. ग्राफिक्स व प्रिंटेड टीशर्ट :- आपल्या काही शर्ट, टीशर्ट व पॅन्टवर प्रिंटेड डिजाईन असते. ही डिजाईन रबर किंवा इतर रंग वापरुन तयार केलेली असते. वारंवार धुण्याने ही डिजाईन किंवा प्रिंट खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी ग्राफिक्स व प्रिंटेड टीशर्ट हे उलटे करुन म्हणजेच बाहेरची प्रिंटेड बाजू आत व आतली बाजू बाहेर असे करुन धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकावेत.  

३. कपडे गोळे करुन टाकणे थांबवा :- आपण शक्यतो पायांतील मोजे, हातरुमाल किंवा इतर छोटे छोटे कपडे एकत्र करून त्यांचा एक गोळा करून वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतो. परंतु असे केल्याने कपडे व्यवस्थित धुवून निघत नाहीत. त्यामुळे मोजे, रुमाल यांचा एकत्रित गोळा करून टाकण्याऐवजी ते सुटे करून धुवायला टाकावेत. रुमालाची व्यवस्थित घडी उघडून व मोजे गोळा न करता धुवायला टाकावेत. 

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

४. हुक्स लावून कपडे धुवायला टाकावेत :- ब्रेसीयर किंवा त्यासारखे इतर हुक्स असणारे कपडे त्यांचे हुक्स लावून मगच धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकावेत. हे हुक्स तसेच उघडे ठेवून धुवायला टाकल्यास ते हुक्स इतर कपड्यात अडकून हुक्स तुटू शकतात. त्याचबरोबर हे हुक्स इतर डिझाइनर किंवा धागा वर्क असणाऱ्या कपड्यांमध्ये अडकून त्यांचे धागे निघू शकतात. यामुळे कपड्यांचे हुक्स लावून कपडे धुवायला टाकावेत. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

५. नाजूक कपड्यांसाठी लॉंड्री बॅगेचा वापर करावा :- आपले काही कपडे हे फारच नाजूक असतात. त्या कपड्यांवर बारीक नक्षीकाम किंवा धागावर्क असते तर काहीवेळा खडे, मोती यांचे नाजूक काम असते असे कपडे मशीनमध्ये इतर कपड्यांसोबत धुवायला टाकण्याची चूक करू नये. हे कपडे इतर कपड्यांपासून वेगळे धुवावेत तसेच हे कपडे धुताना लॉंड्री बॅगेचा वापर करावा. हे नाजूक कपडे लॉंड्री बॅगेत घालून मगच वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकावेत. 

६. कपड्यांचे खिसे तपासून पाहावेत :- कोणत्याही प्रकारचे कपडे धुवायला टाकताना सर्वात आधी त्यांचे खिसे तपासून पहावेत. काहीवेळा आपण घाई गडबडीत काही वस्तू शर्ट किंवा पॅन्टच्या खिशातून काढायला विसरतो, व हे कपडे असेच धुवायला टाकतो. त्यामुळे कपडे धुवायला टाकण्याआधी खिसे तपासून मगच ते धुवायला टाकावेत.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स