या वयात आता अमूक- तमूक काम करणं, मला काय शोभणार आहे का... अशी वाक्य हल्ली तिशीच्या आसपास असणाऱ्या लोकांकडूनही ऐकायला मिळतात. यात महिला तर अग्रेसर असतात. तिशीच्या झालो म्हणून त्यांनी स्वत:च स्वत:भोवती एक वलय तयार करून घेतलेलं असतं आणि त्याच्याबाहेर पडायला त्या सहजासहजी तयार होत नाहीत. एखादीच हा भेद छेदते आणि तिच्या आवडीच्या गोष्टी करते. पण आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वय हे कधीच अडसर ठरत नाही, हे त्यांच्या नृत्यातून दाखवून देणाऱ्या एक आजीबाई (Amazing dance performance by 60 years old women) सोशल मिडियावर (social viral) सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत.
रवी बाला शर्मा असं या आजीबाईंचं नाव. त्यांना डान्स प्रचंड आवडतो. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करणे आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर शेअर करणे हा त्यांचा छंद. त्यामुळे त्यांच्या इन्स्टा पेजला भेट दिल्यास त्यांचे कित्येक डान्स व्हिडिओ बघायला मिळतात. या वयातही त्यांच्या नृत्यामध्ये दिसून येणारा ग्रेस खरोखरच कमालीचा असून त्यामुळेच तर त्यांचे फॉलोअर्स तब्बल २ लाखांच्या घरात आहेत.
या आजींनी नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर अपलोड केली आहे. यात त्यांनी श्रेया घोषाल आणि कविता सेठ यांच्या "लगन लागी रे..." या गीतावर बहारदार नृत्य केले आहे. बैठ्या प्रकारच्या या नृत्यात त्यांनी दाखवलेले हावभाव केवळ अप्रतिम असून नृत्य बघणारा प्रत्येक जण त्यांचा चाहता होऊन जातो. नृत्य करताना त्या खरोखरच त्यांचं वय विसरून जातात आणि आणखी तरुण होऊन जातात. म्हणूनच तर 'वय' हा बहाणा देऊन तुमची आवडती गोष्ट करणं टाळत असाल, तर या आजींचा हा व्हिडिओ बघा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्याच..