वय वर्षे ६४ म्हणजे साधारणपणे उतारवय. या वयात देवाधर्मात मन रमवायचे आणि रिटायर्ड आयुष्य जगायचे असे अनेकांचे स्वप्न असते. पण या वयात एक महिला व्यायाम करुन बॉडी कमावते. आपल्याला या महिलेचे म्हणजेच खरं तर आजीचे फोटो पाहून विश्वास बसणार नाही. पण वयाच्या ६४ व्या वर्षीही ती बॉडी बिल्डींग करते. त्यांचा व्यायाम पाहून आपण हैराण होऊ पण या वयातही त्या न थकता, कंटाळता हा व्यायाम करतात. त्यांचे नाव आहे लीजले मॅक्सवेल. त्यांचे फोटो पाहून आपल्याला त्यांनी कमावलेल्या बॉडीचा अंदाज येईलच (64 years old Women Lesley Maxwell Body Building Viral Photos).
पण या वयातही न थकता त्या घेत असलेले कष्ट खरंच कौतुकास्पद आहेत. शरीर पिळदार होण्यासाठी त्या किती व्यायाम करत असतील हे त्यांचे फोटो पाहून लक्षात येते. इन्स्टाग्रामवर त्यांचे १ लाखांहून जास्त फॉलोअर्स असून या वयातही त्या करत असलेल्या व्यायामामुळे त्यांचे सगळ्यांनाच कौतुक आहे. व्यायाम आणि आहार यामुळे वयाच्या ६४ व्या वर्षीही त्या ५० वर्षांच्याच दिसतात. लीजले या पर्सनल बॉडी बिल्डींगचे ट्रेनिंग देत असून त्यांना या क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
लीजले यांनी आतापर्यंत बॉडी बिल्डींगमध्ये ३० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. लीजले या मूळच्या ऑस्ट्रेलियातील असून त्या बॉडी बिल्डींगसाठी आहारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगतात. आपल्या बॉडी बिल्डींगचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत त्या चाहत्यांना त्यांनी व्यायामासाठी घेतलेली मेहनत दाखवतात. प्रत्येकाने वजने उचलायला हवीत आणि बॉडी कमवायला हवी असे लीजले यांचे मत आहे. या वयातही त्या बिकीनीमध्ये फोटोशूट करुन ते फोटो अपलोड करतात. त्यामुळे त्यांच्यात असलेला उत्साह आणि व्यायामाची जिगर आपल्याला दिसून येते.