Join us  

Old age love: 73 व्या वर्षी आजी पडल्या प्रेमात; म्हणाल्या जागतिक महामारीत वाटलं नव्हतं 'असं' काही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 2:14 PM

Social viral: वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तुम्ही प्रेमात पडू शकता आणि तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं... असंच तर झालं या अमेरिकन आजींचं (granny in USA)..

ठळक मुद्देआपण या वयात कुणाच्या तरी प्रेमात पडलो आणि या वयात आपल्याला आपलं true love मिळालं याचं खरंतर या आजींना आश्चर्य वाटतं आहे.

कुणीतरी आवडणं, त्याच्याशी आपली नजरानजर हाेणं... हळूच प्रेमाची कबूली, प्रेमात अधीर झालेलं मन आणि एकमेकांची लागलेली ओढ ही काही फक्त तरूण मंडळींचीच मक्तेदारी नाही बरं का.. आणि हे सगळं होण्यासाठी तुम्ही एका ठराविक वयातलेच असले पाहिजेत, असंही काही नाही.. म्हणतात ना प्रेमाला काही वय नसतं... ते अगदी खरं आहे बरं का.. म्हणूनच तर प्रेमातली ही हुरहूर आता ७३ वर्षांच्या आजीबाई (73 years old women got her true love) अनुभवत  आहेत आणि त्यांनी त्यांचं हे प्रेम जगजाहीरही केलं आहे.

 

आपण या वयात कुणाच्या तरी प्रेमात पडलो आणि या वयात आपल्याला आपलं true love मिळालं याचं खरंतर या आजींना आश्चर्य वाटतं आहे. बरं त्यांना त्यांचं प्रेमाचं माणूस मिळालं ते ही अगदी कोरोना भरात असताना.... त्यांच्या या नव्या नात्याबद्दल आजी खूपच खुश असून त्यांचा नुकताच साखरपुडाही झाला आहे. हातात अंगठी असलेला एक फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला असून त्यांची ही पोस्ट जगभरात कमालीची व्हायरल झाली आहे.

 

पेशाने या आजी प्राध्यापिका आहेत. तरूण वयात त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांनी जवळजवळ ४० वर्षे संसार केला. पण वयाच्या सत्तरीत त्यांना समजलं की त्यांच्या नवऱ्याचं दुसऱ्याच एका बाईसोबत अफेअर होतं आणि तो त्यांना आतापर्यंत फसवत होता. नवऱ्याची ही भानगड समजताच आजीबाई भयंकर चिडल्या आणि त्यांनी नवऱ्याला थेट घटस्फोट देऊन टाकला. वयाच्या ७० मध्ये मी पुन्हा एकदा सिंगल असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं.. पण या घटनेनंतर त्यांनी त्यांचं प्रोफाईल सोशल मिडियावर शेअर केलं आणि सोशल मिडियातूनच त्यांना त्यांचं खरंखुरं प्रेम मिळालं, असं या आजी सांगत आहेत.

 

कोणत्याही वयात आपण प्रेमात पडू शकतो, प्रत्येकाला मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत नेटकरी मंडळींनी या आजींना जोरदार पाठिंबा दिला आहे. घटस्फोट झाल्यानंतर मी खूप डिप्रेस होते, नव्याने आयुष्य कसं सुरू करायचं, हे मला समजत नव्हतं. पण तुमची ही पोस्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली, अशी प्रतिक्रियाही या आजींना अनेक जणांकडून आली आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअमेरिकाज्येष्ठ नागरिकदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट