इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन नेहमी काही ना काही पोस्ट होत असतं. कधी खूप कामाचं तर कधी एकदम टाइमपास. कधी हसून पोट धरायला लावणारं तर कधी डोळ्यात पाणी आणणारं असं बरंच काही या माध्यमांवरुन व्हायरल होत असतं. समाजमाध्यमांवरुन व्हायरल होणारे व्हिडीओ हे माहिती देण्याचं, शिकवण्याचं साधन झालं आहे. शिवाय जो आनंद आणि उत्कट क्षण आपण अनुभवला तो इतरांनीही अनुभवावा या इच्छेने हे व्हिडीओ शेअर केले जातात. अनेक व्हिडींवर लाइक्स आणि कमेण्टसचा पाऊस पडतो, तर काही व्हिडीओ अगदीच दुर्लक्षित केले जातात. 2021 मधे भारतात समाजमाध्यमांवरुन लाखो व्हिडीओ व्हायरल झालेत. पण त्यातील मोजक्या काही व्हिडीओंनी नेटिझन्सला वेगळा अनुभव, आनंद आणि संवेदना दिली. अवघ्या दोन मिनिटात मिलिअन व्ह्युअर्सचं हदय या व्हिडीओंनी जिंकल. असेच हे 8 व्हिडीओ जे मोठ्या प्रमाणात व्हायरल तर झालेच, पण प्रत्येक व्हिडीओनं बाईचं वेगळं रुपही दाखवलं.
Image: Google
1. अँलेक्सा आरती म्हण
घरात आणलेल्या अँलेक्साला काहीही सांगितलं की ते ती लगेच ऐकते, हे पाहून एका आजीनं अँलेक्सा एक काम सांगितलं. आजीला ऐकायची होती गणपतीची आरती आणि भजनं. तिने अँलेक्साला गणपतीची आरती म्हण असं सांगितलं. अँलेक्साला फक्त इंग्रजीमधे ऑर्डर दिलेल्याच कळतात हे काही आजीला माहित नव्हतं. आजी तिच्या भाषेत ऑर्डर देत होती.
अँलेक्सानं आरतीमधे कोणते भाग कव्हर झाले पाहिजेत असं विचारल्यावर आजीनं वैतागानं अँलेक्साला दरडावून सांगितलं, गणपतीच्या भजनात जे जे येतं ते सर्व ऐकवं. आजी आणि अँलेक्सामधला हा निरागस संवाद ऐकून काही मिनिटं नेटिझन्सचीही करमणूक झाली.
2. सासू असावी अशी!
लग्नप्रसंगात नवरी झालेल्या मुलीला सतत वाकून नमस्कार घालावा लागतो.पण व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत मात्र नवीन सुनेपुढे वाकलेल्या सासूचं मात्र खूपच कौतुक झालं.
लग्नाची रिसेप्शन पार्टीतलं हे दृश्य. नवरीला साडी फार सवयीची नसावी. पायात येणार्या साडीच्या निर्यांमुळे अस्वस्थ झालेली सून बघून सासूनं खाली बसून तिच्या निर्या ठीक करुन दिल्या. परत तिला आता बरोबर ना असा प्रश्न विचारुन तिच्या कम्फर्टची काळजी देखील घेतली. सासू सुनेमधलं एक चाकोरीबध्द चित्रं जे नेहमी रंगवलं जातं ते या व्हिडीओनं सहज खोडून काढलं.
Image: Google
3. हे लग्न आहे की कबड्डीचा खेळ
लग्नात काही विधी परंपरा ठरलेल्या असतात. नवरा नवरीनं एकमेकांन हार घालण्याचा विधी. या विधीला दोन्ही बाजूंनी हार घालताना झुकायचं नाही म्हणून बरीच चढाओढ होते. आता तर लग्नातच पंडित मंगलाष्टक सुरु होण्याच्या आधीच सांगतात नवर्या मुलीला आणि मुलाला उचलू नये म्हणून.पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मात्र घडलं वेगळंच. नवर्या मुलाला सहजासहजी हार गळ्यात घालू द्यायचा नाही हा विचार नवर्या मुलीच्या डोक्यात एकदम पक्काच होता हे व्हिडीओ पाहून लगेच समजतं. नवरीनं नवर्याच्या गळ्यात हार टाकला मग नवरा टाकायला गेला तर नवरी आधी मागे झुकली, मग उजव्या बाजूला, मग डाव्या बाजूला, नंतर तर नवरी जागा सोडून खूपच मागे झाली. हार घेऊन पुढे येणारा नवरदेव पाहून मग नवरी स्टेजवर इकडे तिकडे पळू लागली.
तिचं पळणं आणि नवरदेवाचं तिच्या मागे हार घाऊन मागे जाणं बघून स्टेजवरचा सोफ्याची अडचण वाटू नये म्हणून सोफाही बाजूला काढला गेला. सोफा काढल्यावर मग नवरीला पळायला आणखीनच जागा मिळाली आणि नवरीनं स्टेज सोडून खाली पळायला सुरुवात केली. लग्नातल्या या प्रसंगानं उपस्थितांना तर हसू फुटलंच पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मात्र हे लग्न आहे की कबड्डी असा प्रश्न नेटिझन्सने विचारला.
Image: Google
4. बाबा तुम्ही विमान चालवणार!
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधली लहान मुलगी, तिचं नाव शनाया मोतीहर. हा व्हिडीओ तिच्या नावानं इन्स्टाग्राम अकाउण्ट करुन मग व्हायरल केला गेला. तिच्यासोबत प्रवास करणारीने हा व्हिडीओ तयर केला.
शनायाचे वडील पायलट आणि शनाया पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत होती. कॉकपिटच्या बाहेर येऊन बाबाने शनायाला हाय केले. आपले बाबा स्वत: विमान चालवून मला दिल्लीला घेऊन जाणार म्हणून शनाया अगदी आनंदी होती. बाबांना पाहून लव्ह यू पापा म्हणत होती. शनायाचा हा निरागस आनंद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून हा व्हिडीओ व्हायरल झाला.
5. बाळाचा पहिला स्पर्श
बाळाला पहिल्यांदा हातात घेण्याचा प्रसंग कोणत्याही आईसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि तो क्षण आणि स्पर्श कधी न विसरावा असा असतो. पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याला लगेच आईपासून दूर नेलं जातं. आणि दहा दिवसांनी आईला आपलं बाळ पाहायला मिळतं, त्याला हातात घ्यायला मिळतं. तो क्षण आनंदासोबतच आईसोबत इतरांनाही हळवा करणारा.
हा व्हिडीओ पश्चिम बंगाल येथील हावडा येथील एका दवाखान्यातला. सज्जादिन ही बाळाची आई. कोविड पॉझिटिव्ह. नेमक्या त्याच दरम्यान तिची प्रसूती झाली. प्रसूती झाली. बाळ सुखरुप बाहेर आलं. पण आई मात्र व्हेंटिलेटरवरच. श्वास घेण्यास झगडणारी सज्जादिन आठ दिवसानंतर स्वत:हून श्वास घेऊ लागली. दहाव्या दिवशी व्हिलचेअरवरुन डॉक्टरांनी तिला तिच्या बाळाजवळ नेलं आणि पहिल्यांदा बाळ तिच्या हातात दिलं. बाळाला पहिल्यांदा बघितल्यावर, त्याच्या गालावरुन हळूच बोटं फिरवताना तिला आनंदही होत होता आणि डोळ्यातले अश्रू अडवणंही अवघड जात होतं. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटिझन्सचा जीवही हळहळला.
Image: Google
6. आपल्या लाडक्या कुत्र्याचं औक्षवण
घरातला पाळीव प्राणी म्हणजे किती जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा असतो हे त्या प्राण्याच्या मालकाकडे पाहून कळतं. असाच जिव्हाळा दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ होता सुधा मूर्तींच्या घरातला. त्यांच्या कुत्र्याचा वाढदिवस होता. म्हणून सुधा मूर्तींनी त्याला प्रेमानं ओवाळलं, त्याला हॅपी बर्थडे हे गीत म्हणून शुभेच्छाही दिल्या.
सुधा मूर्तींसोबत त्यांच्या बहिणेनीही सुधा मूर्तींच्या या लाडक्या कुत्र्याला ओवाळून त्याचं कौतुक केलं. या व्हिडीओनं घरात पाळीव प्राणी असणारे आणि नसणारे दोघाही गटातील लोकांना प्राण्यांविषयी असणार्या प्रेमाच्या ऊबेचा सुखद अनुभव दिला.