लॉटरीचं तिकीट (lottery ticket) खरेदी करण्याचा नाद अनेक जणांना असतो. बऱ्याचदा तिकीट नुसतंच घेतलं जातं.. पण त्यातून फायदा मात्र क्वचितच एखाद्याला होतो. असाच लॉटरीच्या तिकीटाचा जबरदस्त फायदा झाला आहे ड्यूक येथे राहणाऱ्या ८६ वर्षांच्या आजीबाईला.. लॉटरीच्या तिकीटावर त्यांनी मिळविलेली रक्कम तर बऱ्यापैकी आहेच, पण त्यापेक्षाही नेटकऱ्यांना अधिक भावलं आहे ते आजीबाईंनी पाळलेलं प्रॉमिस..
त्याचं झालं असं की मॉरियन फॉरेस्ट (Marian Forest) या आजीबाई ड्यूकमधील एका स्टोअर मार्टमध्ये नेहमी जायच्या. त्यामुळे त्यांची आणि दुकानातल्या कॅशिअरची बऱ्यापैकी ओळख होती. त्या कॅशियरने एकदा या आजीबाईंना जॅकपॉटसाठी (jackpot) पैसे लावायला सांगितले आणि लॉटरीचे तिकीट खरेदी करा असा आग्रह केला. आजीबाई काही यासाठी चटकन राजी होत नव्हत्या. पण शेवटी त्या तयार झाल्या. त्यांनी जॅकपॉट आणि लॉटरीचे तिकीट (lottery ticket) खरेदी केले. तिकिट खरेदी केल्यावर त्या कॅशिअरला म्हणाल्या की तु सांगतो आहेस त्यामुळे मी तिकीट घेतले. आता जर मला खरंच जॅकपॉट लागला तर बक्षिसाच्या रकमेतली अर्धी रक्कम मी तुला देईल... असं म्हणून आजीबाई दुकानातून बाहेर पडल्या. कॅशियर ही गोष्ट विसरूनही गेला. नंतर काही दिवसांनी जॅकपॉटचा आणि लॉटरीचा निर्णय घोषित झाला. आजीबाईंना काही जॅकपॉट लागला नाही.
पण त्याचवेळी त्यांना ३०० डॉलरची (300 dollers) लॉटरी लागली असल्याचे समजले. ३०० डॉलर ही बऱ्यापैकी चांगली रक्कम असल्याने आजीबाई खुश झाल्या आणि त्यांना त्यांचे प्रॉमिस आठवले. त्यांना माहिती होतं की त्या कॅशिअरने सुचवलं नसतं तर आपण काही लॉटरीचं तिकीट घेतलं नसतं. त्यामुळे या पैशांवर आपला जसा हक्क आहे, तसाच तो त्या कॅशिअरचाही आहे. त्यामुळे त्यांनी एक स्वतंत्र पाकीट दुकानातल्या त्या कॅशिअरसाठी बनवले आणि त्यात बक्षिसाची अर्धी रक्कम म्हणजेच १५० डॉलर टाकले.
या पाकीटावर कॅशिअरचे नाव लिहिले आणि स्वत: जाऊन त्या ते पैसे कॅशिअरला देऊन आल्या. वृद्ध आजीबाईंचं प्रेम, त्यांनी सहज म्हणून केलेलं प्रॉमिस आणि ते पुर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड हे सगळं पाहून त्या कॅशिअरला रडू कोसळले आणि तो आजीबाईंच्या गळ्यात पडला. लॉटरीच्या तिकीटाची ही सगळी गंमत ऐकून दुकानातले इतर लोकही आजीबाईंच्या दिलदार वृत्तीला सलाम करत होते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर झाला असून त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत.