आईवडील हे प्रत्येकासाठी काय असतात हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आणि आपण खूश राहावे यासाठी सर्वस्व अर्पण करणारे आईवडील कायम आपल्या भल्याचाच विचार करत असतात. मात्र हे आईवडील जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा आभाळ फाटल्यासारखे होते. त्यांची कमी कोणीच भरुन काढू शकत नाही अशावेळी त्यांच्या वस्तू, त्यांनी दिलेल्या आठवणी हिच आपली खरी शिदोरी असते. अशीच एक शिदोरी एका महिलेला मिळाली आणि तिने ती सोशल मीडीयावर शेअरही केली (Woman Finds Fathers Heartwarming Note Nine Years After his Death Viral Photo).
तर अमेरिकेत एमी क्लूकी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. एकदा त्या आपल्या वडीलांची मधमाशी पालनाची उपकरणे पाहत होत्या. त्यामध्ये त्यांना वडीलांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी मिळाली. यामध्ये लिहीले होते, “ मला आशा आहे ही नोट माझ्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला मिळेल जो मधमाशी पालन करण्यासाठी उत्सुक आहे. मधमाशी पालन एक अतिशय सोपी गोष्ट आहे आणि त्यातील बारकावे आपल्याला ऑनलाइन शिकता येऊ शकतात. मधमाश्या मधाच्या पलिकडेही बरेच काही देतात त्यामुळे छंद म्हणून करता येणारा आणि जास्तीची मिळकत म्हणून हा चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे घाबरु नका, धाडसी राहा, शुभेच्छा”
Note from my dad found in his bee keeping equipment nine years after his death. He is missed. pic.twitter.com/M4iIbT0Iqn
— Amy Clukey (@AmyClukey) August 15, 2022
शेवटी या वडीलांनी लव्ह असे म्हणून खाली डॅड असेही लिहीले आहे. क्लूकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर वडीलांची ही चिठ्ठी शेअर केली असून तुम्हाला आम्ही कायम मिस करु असेही त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. २ दिवसांतच या भावूक करणाऱ्या पोस्टला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर जवळपास २.५ हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ४१ हजारहून जास्त जणांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. त्यासोबत या महिलेने आपल्या वडीलांसोबत गाडीवर बसलेला एक फोटोही शेअर केला आहे. ही चिठ्ठी त्यांनी २०१२ मध्ये लिहीली होती तर २०१३ मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांना एकूण ६ मुले असून क्लूकी या सगळ्यात मोठ्या आहेत.