रस्त्यावरचे भटके कुत्रे म्हटले की आपल्याला एकतर भिती वाटते किंवा ते नकोसे तरी वाटतात. असेच एका महिलेला कुत्री अजिबात आवडत नव्हती. मात्र कुत्र्यांच्या आसपासही न फिरकणाऱ्या या महिलेला अचानक रस्त्यावरच्या कुत्र्यांवर प्रेम जडले. इतकेच नाही तर वयाच्या ९० व्या वर्षी ही महिला या कुत्र्यांसाठी पहाटे ४ वाजता उठून खाऊ बनवते आणि त्यांना प्रेमाने खाऊही घालते. आता हा इतका मोठा बदल कसा झाला असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर त्याचे झाले असे की एकदा या महिलेच्या नातीने घरी एक छोटे कुत्रे (Street Dog Puppy) आणले. सुरुवातीला या कुत्र्याला लांबूनच पाहणारी ही महिला हळूहळू त्याच्या जवळ जायला लागली. घरातील हे कुत्रे आवडल्याने मग रस्त्यावरच्या कुत्र्यांशी पण तिची मस्त दोस्ती जमली (Humans Of Bombay) .
ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कनक नाव असलेली ९० वर्षांची महिला आपल्याला दिसते. वयाच्या ९० व्या वर्षी आपण कुत्र्यांवर कसे प्रेम करायला लागलो हे सांगणारी ही गोष्ट आहे. कनक म्हणतात, माझी नात सनाने कोको नावाचे एक कुत्र्याचे पिल्लू घरी आणले. दिवसभर तो घरात इकडे-तिकडे करायचा, खायचा, प्यायचा. पण त्याच्या या लहान-सहान गोष्टींमुळेच तो मला क्यूट वाटायला लागला. त्याला पाहिल्यावरच तो किती क्यूट आहे असे मला वाटल्याने माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. घरातील कुत्र्यावर प्रेम जडल्यामुळे वयाच्या नव्वदीमध्ये या आजी रस्त्यावरच्या कुत्र्यांवरही प्रेम करायला लागल्या आणि त्यांना जीव लावायला लागल्या.
नातीला कुत्री आवडत असल्यामुळे तिचे कुत्र्यांवर असलेले प्रेम आपल्यात कधी पाझरत गेले हे आजीलाही समजले नाही. सनाला कुत्र्यांची मनापासून आवड असल्याने ती आपण राहत असलेल्या भागातील भटक्या कुत्र्यांची काळजी घ्यायची. त्यांचे लसीकरण करणे, त्यांच्यावर योग्य ते उपचार करणे हे सगळे करायची. वयामुळे बाहेर फिरायचे काम कनक ९० व्या वर्षी करु शकत नसल्या तरी त्या पहाटे ४.३० वाजता उठून या कुत्र्यांसाठी खाऊ तयार करायच्या. सना हा खाऊ घेऊन आपल्या भागातील कुत्र्यांना खाऊ घालायची. आपण केलेल्या खाऊचा आनंद कुत्रे इतक्या आनंदाने घेताहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यानंतर कनक यांना कुत्र्यांना आपल्या हाताने खाऊ भरवण्याचा मोह झाला. एक दिवस आपणच आपल्या हाताने या कुत्र्यांना भरवायचे असे कनक यांनी ठरवले आणि स्वप्नातही शक्य वाटणार नाही अशी गोष्ट आपण वयाच्या या टप्प्यावर केली याचे त्यांना स्वत:लाही आश्चर्य वाटते.