जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाला जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागतो. याला माणूस अपवाद कसा असेल? पण मनुष्य जेव्हा जगण्यासाठी काम करतो, उदरनिर्वाहासाठी व्यवसाय/नोकरी/ मजूरी करतो ते करण्याचं एक विशिष्ट वय असतं. नोकरी असेल तर साहजिकच वयाच्या 58 ते 60 वर्षी निवृत्ती घ्यावी लागते. व्यवसाय असेल तर शरीर थकलं की व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जातो. मोल मजुरी करणारेही शरीर थकलं की शांत बसून मुलं जे कमावतील त्यावर जगतात. जगण्यासाठीच्या संघर्षाला चौकट नसली तरी एक साधारण आराखडा तरी असतो. पण केरळमधल्या अलप्पुझा जिल्ह्यातील देवीकुलंगारा गावातल्या 91 वर्षांच्या थंगम्मा (91 years old Thangamma) नावाच्या आजीच्या कष्टांना काही अंत दिसत नाही. थंगम्मा या वयातही उदरनिर्वाहासठी गावातल्या पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर चहाची टपरी (story of 91 years old Thangamma struggle) चालवून पैसे कमावतात.
Image: Google
एका वाहन अपघातात सर्वस्व गमावलेल्या थंगम्मा आजीला जगण्यासाठी शरीरात बळ नसतानाही पुन्हा उठावं लागलं. गेल्या 17 वर्षांपासून थंगम्मा चहाचा गाडा चालवतात. त्यांना त्यांच्या कामात त्यांची 68 वर्ष वयाची मुलगी वंसतकुमारी मदत करते. थंगम्मा आजीच्या कष्टाचा दिवस पहाटे पाचला सुरु होतो आणि रात्री नऊ नंतर मावळतो. सकाळी 7 ते 8 वाजता थंगम्मा चहाची टपरी सुरु करतात. दुपारी अडीचपर्यंत टपरीवर चहा विकला की अडीच नंतर टपरीवर वडे, केळाची भजी असे नाष्ट्याचे पदार्थ तयार करुन विकतात. सकाळी चहा करायला उभ्या राहाणाऱ्या थंगम्मा नाश्त्याचे पदार्थही स्वत: करतात. संध्याकाळी उशिरापर्यंत थंगम्मा आजीनं बनवलेले सर्व पदार्थ विकले जातात. रात्री नऊ -साडे नऊ वाजता औषधं घेतल्यावर थंगम्मा आजीचा दिवस संपतो.
टपरी बंद केल्यावर थंगम्मा आजी सर्वात आधी आलेल्या पैशातून दुधवाल्याचे, किरणा दुकानदाराचे पैसे चुकते करतात. अशा प्रकारे थंगम्मा आजी हातावर पोट घेऊन जगतात. थंगम्मा आजीची परिस्थिती गावातल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच पंचायत समितीने थंगम्मा आजीला पंचायत समितीच्या कार्यालयासमोर चहाची टपरी सुरु करण्याची परवानगी दिली. थंगम्मा आजीकडे स्वत:च घर नाही. एका भाड्याच्या खोलीत त्या राहातात. पंचायत समितीनं दारिद्रयरेषेखालील लोकांना घर घेण्यासाठी असलेल्या योजनेतून विशिष्ट रक्कम थंगम्मांना दिली पण घर बांधता येईल एवढे पैसेच थंगम्माकडे नाही. चहाच्या टपरी व्यतिरिक्त उत्पन्नाचं साधन म्हणजे शेतकऱ्यांना मिळणरी 1600 रुपयांची पेन्शन. या पेन्शनचा उपयोग थंगम्मा स्वत:च्या आणि मुलीच्या औषधोपचारासाठी करतात. पण रोजच्या जगण्याला लागणारा पैसा उभारण्यासाठी रोज टपरीवर उभं राहून चहा, नाश्त्याचे पदार्थ विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
Image: Google
आपल्याला मदत करता येईल अशी मुलांची देखील परिस्थिती नाही , त्यामुळे कराव्या लागणाऱ्या कष्टासाठी त्या कोणालाच बोल लावत नाही. केरळच्या छोट्याशा गावातली थंगम्मा आजीची गोष्ट आज सोशल मीडियामुळे देशभर व्हायरल झाली आहे. वयाच्या 91 व्या वर्षीही कष्टासाठी तयार असणाऱ्या थंगम्मा आजीचं सोशल मीडियावर कौतुक सुरु आहे. थंगम्मा आजीचा जगण्याच संघर्ष ज्यांच्याकडे काहीच नाही, आता जगायचं कसं? असा प्रश्न पडलेल्ल्यांना उमेद देणारी आहे. लोकं थंगम्मा आजीचं कौतुक तर करताच आहेत पण या वयात कष्ट कराव्या लागणाऱ्या माऊलीला सरकारनं काही मदत करावी अशी मागणीही करत आहे. पण स्वत: थंगम्मा आजी मात्र कोणाकडूनच कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता रोज ऊगवत्या सूर्याला साक्षी ठेवून कष्टाला सुरुवात करतात.