Join us  

भाजी-आमटीसाठी रोज लागणारा लसूण ‘तिच्या’ जीवावरच उठलाय, पाहा अजब आजाराची तऱ्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2024 6:10 PM

लसूणाचा कुणाला त्रास होईल अशी आपण कल्पना तरी केली होती का?

ठळक मुद्देम्हणून नाइटिंगेल आता आपल्या आजाराविषयी बोलू लागली आहे.

माधुरी पेठकर

३२ वर्षांची फोनिक्स नाइटिंगेल. अमेरिकेतील मिनेसोटा येथे राहते. ती एका दुर्मीळ विकाराचा सामना करत आहे. या विकाराला कारणीभूत ठरतोय तो तिच्या दररोजच्या आहारातला लसूण. गेल्या ३१ वर्षांपासून आपल्याला नेमका कोणता आजार झालाय हेच तिला कळत नव्हते. तिच्या आजाराचे निदान आता मागच्या वर्षी झाले आहे.

आतापर्यंत नाइटिंगेलला ४८० वेळा या आजाराचे झटके आले आहेत. तिला अन्नपदार्थांतल्या सल्फर या घटकाचा त्रास होतोय, असे निदान डाॅक्टरांनी केलंय. सल्फर प्रामुख्याने लसणात आढळतो. सल्फरयुक्त पदार्थ खाण्यात आले किंवा एका वेळेस जास्त खाण्यात आलं की, लगेच किंवा काही दिवसांनी नाइटिंगेलला एकामागोमाग उलट्या व्हायच्या, डोकं दुखायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. हा त्रास एका दिवसापुरता नाही, तर अनेक दिवस व्हायचा. आता कळलं की, तिला सल्फरची ॲलर्जी आहे.

(Image : google)

डाॅक्टरांकडे गेल्यावर तपासण्या व्हायच्या; पण त्यात काहीच आढळायचं नाही. आपल्याला भुताटकी, तर झाली नाही ना, अशी भीती तिला वाटू लागली; पण त्रासाचं कारण शोधणं आवश्यक होतं. त्यामुळे वेगवेगळे डाॅक्टर्स, तपासण्या सुरूच होत्या. आपल्याला काय झालंय हे शोधण्यात वेळ, पैसा दोन्ही खर्च होत होते. तिच्या प्रयत्नांना यश आलं ते मागच्या वर्षी. आता नाइटिंगेल या आजारावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांच्या शोधात आहे.आपल्यासारखाच त्रास कोणाला होत असेल, तर त्याला आपल्या माहितीचा उपयोग व्हावा, म्हणून नाइटिंगेल आता आपल्या आजाराविषयी बोलू लागली आहे. 

टॅग्स :आरोग्यसोशल व्हायरल