लहान मुलं कंटाळा आला की अनेकदा आपल्याकडे मोबाइलची मागणी करतात. काही वेळा आपण त्यांना मोबाइल द्यायला नकार देतो. पण काही वेळा खूपच हट्ट केला तर मात्र आपण गाणी पाहण्यासाठी किंवा गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल देतो. तेव्हा मूल यु ट्यूबवर नेहमीचेच काही पाहील असे आपल्याला वाटते. बरेचदा आपण ते काय पाहतात याकडे लक्षही ठेवतो पण कधी काम असेल तर मात्र आपले त्यांच्याकडे पुरेसे लक्ष राहत नाही. अशावेळी मुलं आपल्या आणि त्यांच्याही नकळत अशा काही गोष्टी करतात की नंतर ते कळल्यावर आपल्याला हादरायला होते. नुकतीच अशीच एक घटना घडली असून एका ५ वर्षाच्या मुलीने आपल्या आईच्या मोबाइलवरुन थोडीथोडकी नाही तर तब्बल २.५ लाख रुपयांची खेळणी ऑर्डर केली (5 year old Girl Orders Items Worth Rs 2.47 Lakh On Amazon Using Her Mother's Phone).
मुलीला मोबाइल हातात देणे तिच्या आईला चांगलेच महागात पडले. कारण या मुलीने तिच्याही नकळत आईच्या मोबाइल अकाऊंटवरुन लाखो रुपयांची खेळणी आणि चपला ऑर्डर केली. ही घटना अमेरीकेतील असून जेसिका नून्स असे या महिलेचे नाव आहे. तिने लीला या आपल्या मुलीला नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी आपला मोबाइल दिला. यावेळी मुलीने आपल्या आईच्या मोबाइलवरील अॅमेझॉन अकाऊंटवरुन तब्बल ३ हजार डॉलरचे सामान ऑर्डर केले. यामध्ये १० मोटारसायकल, १ जीप आणि १० जोडी काऊगर्ल शूजचा समावेश होता. या सगळ्या गोष्टींची किंमत ३१८० डॉलर इतकी होती.
आपण अॅमेझॉन हिस्ट्री चेक केली तेव्हा आपल्या अकाऊंटवरुन अशाप्रकारे खरेदी करण्यात आल्याचे जेसिकाच्या लक्षात आले. विशेष म्हणजे लीलाने ऑर्डर केलेले शूज हे जेसिकाच्या मापाचे होते. लीलाने प्रॉडक्ट सिलेक्ट केल्यानंतर बाय नाऊ या पर्यायावर क्लिक केल्याने काही कळायच्या आत ही ऑर्डर नोंदवली गेली. यातील अर्धे सामान जेसिकाने लगेचच कॅन्सल केले. पण काही गोष्टी डिलिव्हरीसाठी निघालेल्या असल्याने त्या रद्द करणे अवघड होते. अशाप्रकारची ही पहिला घटना नाही तर या आधीही अमेरीकेत २२ महिन्याच्या एका बाळाने आपल्या आईवडीलांच्या बँक अकाऊंटमधून कित्येक लाखांची फर्निचर खरेदी केले होते. त्यामुळे तुम्हीही मुलांच्या हातात अगदी सहज मोबाइल देत असाल तर सावधान. कारण तुमच्या आणि मुलांच्या नकळत तुमचाही बँक बॅलन्स असाच खाली होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.