भारतीय खाद्यपदार्थांमध्ये जितकी विविधता आहे तितकी जगात कोणत्याच पदार्थांमध्ये नाही. प्रत्येक गावात, राज्यात, देशात केल्या जाणाऱ्या पदार्थांची वेगळी खासियत असते. व्हेज, नॉनव्हेज अशा सगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये विविधता पाहायला मिळते. भारतीय पदार्थांमध्ये वापरले जाणारे मसाले आणि ते करण्याची पद्धत वेगळी असल्याने हे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे असतात. परदेशी नागरिकही भारतात आल्यावर किंवा परदेशातही भारतीय़ पदार्थ अतिशय आवडीने खाताना दिसतात. सोशल मीडियामुळे सध्या जगात कुठेही बसून जगाच्या कोपऱ्यात काय सुरू आहे हे समजणे सोपे झाले आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल असून सोशल मीडियावर त्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हिडिओमध्ये एक लहान ऑस्ट्रेलियन मुलगी भातासोबत कढाई चिकन अतिशय आवडीने खाताना दिसत आहे. यामध्ये ती ज्याप्रकारे मन लावून खाते ते पाहूनच तीला हा पदार्थ आवडला हे आपण वेगळे सांगायला नको. आपण उन्हाळ्याच्या दिवसांत ज्याप्रमाणे मँगो आईस्क्रीम चाटून पुसून खातो त्याचप्रकारे ही मुलगीही अतिशय आवडीने मँगो आईस्क्रीम खाताना दिसत आहे. अशाप्रकारे मेन कोर्स आणि डेझर्ट अशा दोन्हीवर ताव मारल्यानंतर ती गोड बडिशोपही खाते. हे सगळे खाताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही. ही मुलगी हे सगळे पहिल्यांदाच खात असल्याचे या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. अवघ्या २० दिवसांत या व्हिडिओला जवळपास २ लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले असून ५ हजारहून अधिकांनी तो व्हिडिओ लाईक केला आहे. तर नेटीझन्सनी या व्हिडिओवर कमेंट करताना भारतीय पदार्थांबद्दल भरभरुन लिहीले आहे. भारतीय पदार्थ करण्याची पद्धत, त्यात वापरले जाणारे मसाले आणि इतरही अनेक गोष्टींबाबत यामध्ये भारतीय पदार्थांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भारतीय पदार्थांची पुन्हा एकदा वाह वा झाली हे वेगळे सांगायला नको.