अनेक जणांच्या दृष्टीने कपड्याच्या घड्या घालणं हे खूप कंटाळवाणं काम आहे.. एकेक कपडा हातात घ्या, त्याला तीन- चार बाजूने फोल्ड (folding clothes) करत त्याची घडी घाला आणि तो व्यवस्थित जागच्याजागी ठेवून द्या.. हे सगळं करण्यासाठी खरोखरंच खूप पेशन्स लागतात. ज्यांच्याकडे एवढे पेशन्स नसतात, त्यांच्या कपाटात कपडे घड्या घातलेले नाही, तर कोंबलेले दिसतात.. तुम्हीही याच प्रकारातले असाल आणि तुम्हालाही कपड्यांच्या घड्या घालण्याचा जाम कंटाळा येत असेल, तर या चिमुकल्याचा हा व्हिडिओ एकदा बघाच..
मुर्ती लहान पण किर्ती महान असंच काहीसं दाखवणारा हा व्हिडिओ आहे.. या व्हिडिओमधला चिमुकला जणू आपल्याला शिकवतो आहे की झटपट कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या. व्हिडिओमध्ये दिसणारा हा मुलगा अवघा ५ ते ६ वर्षांचा आहे. इन्स्टाग्रामच्या creativetricks01या पेजवर हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला असून आतापर्यंत २४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. हा मुलगा ज्या पद्धतीने कपड्यांच्या घड्या घालतो आहे, ते पाहून प्रत्येकालाच त्याचे कौतूक वाटत आहे. कपड्यांच्या घड्या घालण्याची त्याची अनोखी पद्धत आणि त्याचा स्पीड यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलीच धूम करतो आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की घड्या घालण्यासाठी या मुलाने एका पुठ्ठ्याचा वापर केला आहे. या पुठ्ठ्याला त्याने तीन ठिकाणी कापले आहे. पुठ्ठ्याच्या मधल्या जागी कपडा ठेवायचा आणि आजूबाजूने त्याला फोल्ड करायचे. बस्स.. एवढंच केलं की कपड्याची मस्त घडी तयार. या पुठ्ठ्याच्या साहाय्याने हा चिमुकला अवघ्या काही सेकंदात कपड्यांची अतिशय उत्तम पद्धतीने घडी घालत आहे.. त्याचे कौशल्य खरोखरंच वाखाणण्यासारखे आहे.