एखादी गोष्ट घडायची असेल की, ती अशी काही घडते की एका मिनीटात तुमचे नशीबच बदलून जाते. वाचायला ही अतिशयोक्ती वाटत असली तरी एका महिलेच्या बाबतीत ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. तुमची वेळ चांगली असेल तर एका रात्रीत तुमचे आयुष्य बदलू शकते हे या महिलेच्या उदाहरणावरुन समोर आले आहे. एक महिला तिचे जुने मेल पाहण्यासाठी मेलबॉक्समधील स्पॅम फोल्डर पाहत होती. तेव्हा तिचे लक्ष एका मेलवर गेले की ती २२ करोड रुपयांची मालकीण झाली आहे. आता असे फेक मेल आपल्यालाही अनेकदा येतात. असे मेल उघडून बघू नये, त्यामध्ये व्हायरस असतो. किंवा आपली माहिती घेऊन फसवले जाऊ शकते असे आपण ऐकतो. पण या महिलेने हा मेल उघडून पाहिला आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिने स्पॅम फोल्डरच्या मेलमध्ये वाचलेली गोष्ट खरी निघाली आणि एका रात्रीत ती खरंच २२ कोटी रुपयांची मालकीण झाली.
Laura Spears got the surprise of a lifetime when she checked her spam folder and realized she'd won a $3 million Mega Millions prize! https://t.co/ZmCSxPDQR8pic.twitter.com/HjFeLrL8kR
— Michigan Lottery (@MILottery) January 21, 2022
त्याचे झाले असे की ऑकलंडमध्ये राहणाऱ्या लॉरा स्पियर नावाच्या महिलेने ३१ डिसेंबरच्या मेगा मिलियनमध्ये भाग घेतला होता. यावेळी मिशिगन लॉटरी डॉट कॉमवरुन तिने एक तिकीट खरेदी केले होते. मात्र अचानक तिने काही कामासाठी आपले स्पॅम फोल्डर उघडल्यावर आपल्याला ही लॉटरी लागल्याचे तिच्या लक्षात आले आणि ३ मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटी रुपयांच्या या लॉटरीने एका क्षणात तिचे आयुष्य पालटले. हा मेल पाहिल्यावर लॉरा काहीशा सुन्न झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
याविषयी सांगताना लॉरा म्हणाल्या, मी ३१ डिसेंबर रोजी ही लॉटरी खरेदी केली होती. इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी आपल्याला लागेल याची मला जराही कल्पना नव्हती. हे लॉटरी तिकीट खरेदी केल्यानंतर आपल्या ते लक्षातही नव्हते. पण असाच मेलबॉक्स पाहत असताना आपण करोडपती झाल्याचा मेल दिसला आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असे त्या म्हणाल्या. नुसत्या मेलवर विश्वास ठेवायला नको म्हणून आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासंबंधीचा तपास केल्याचे त्या म्हणाल्या. तर कंपनीच्या वेबसाईटवरही आपण लॉटरी जिंकल्याचे त्यांना समजले, त्यावेळी आपला आनंद गगनात मावत नव्हता असे त्या म्हणाल्या. आपल्याला अशाप्रकारे लॉटरी लागली असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले. त्यावेळी सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.