'लग्न पहावे करुन' असं म्हणतात ते काही खोटं नाही. लग्नात कोणत्या, कशा अणि किती अडचणी येतील किंवा किती प्रकारचे गोंधळ उडतील हे सांगता येणे कठीण. त्यात नातेवाईक, जवळच्या माणसांचे मानपान, रुसवेफुगवे सगळे आलेच. याद्या करणं. किती माणसं येणार याचा अंदाज घेणं. आमंत्रण. केटरिंगवाल्याला सांगणं-पाच-दहा लोक कमी जास्त होतील. शंभर गोष्टी असतात. लग्नात केवढे सोनेनाणे दिले, काय घेतले, काय दिले, किती मोठा शाही लग्न सोहळा केला, किती पंगती जेवून उठल्या, किती लोकांचा मानपान केला, यांसारख्या गोष्टींची आपल्याकडे फार चर्चा केली जाते. लग्नाच्या कामांच्या गडबडीत एखादवेळी कोणाला आमंत्रण द्यायचे राहिले तर आयुष्यभर आपल्याला त्या व्यक्तींचे टोमणे ऐकावे लागतात. त्यात लग्नाला बोलावलं तरी उभ्या उभ्या जाऊन यावं म्हणून धावपळ करत लोक येतातही. पण कल्पना करा, आपण बोलावली तेवढी माणसं, तेवढीच कशाला अर्धी माणसंही लग्नाला आलीच नाही. खर्च वाया गेला, मनस्ताप झाला तर काय होईल. एका जोडप्याच्या आयुष्यात नेमकं असं झालं आणि त्यांच्या आनंदाच्या दिवसाचा विरस झाला(A newlywed said they lost thousands of dollars on a wedding after more than half of their RSVP'd guests didn't show up).
नक्की काय आहे या व्हायरल व्हिडिओत?
ग्रे नार्वेझ-ड्रॅगन या नवविवाहित दांपत्याने, एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, ग्रे नार्वेझ-ड्रॅगियन यांनी आपल्या लग्नाच्या बँक्वेट हॉलचा एक व्हिडिओ शूट करुन टाकला आहे. त्यांच्या लग्नाच्या हॉलमध्ये केवळ २ व्यक्तीच त्यांच्या लग्नासाठी उपस्थित असल्याचे दिसत आहे. ग्रे नार्वेझ-ड्रॅगियन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आमंत्रण दिलेल्या एकूण ८८ जणांनी लग्नाला नक्की येऊ असे कळवले होते. परंतु प्रत्यक्षांत, ४० लोक देखील धड उपस्थित नव्हते. एकंदर ही सगळी परिस्थिती बघता, ग्रे नार्वेझ-ड्रॅगियन दांपत्याने आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी, पाहुण्यांसाठी आयोजित केलेली डी. जे पार्टी हा सगळाच बेत रद्द केला. आणि त्यांचा काही डॉलर्सचा खर्च वाया गेला.
ग्रे नार्वेझ-ड्रॅगियन हे नवविवाहित दांपत्य सांगतात येतो असं कळवून अनेकजण आले नाहीत. एका जवळच्या व्यक्तीने तर लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक असल्याचा मेसेज लग्नाच्याच दिवशी सकाळी पाठविला होता. परंतु ती व्यक्ती देखील लग्नाला उपस्थित नव्हती. आम्ही ज्या लोकांना मोठ्या आपुलकीने आमच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते, त्यांच्यावर आम्ही भरपूर प्रेम करतो. त्यांनी येतो म्हणून येऊ नये हे आमच्यासाठी फार दु:खद आहे.
या जोडप्याने लोकांसाठी छोटेखानी पार्टी, डी. जे पार्टीचे आयोजन केले होते. यासोबतच त्यांनी सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्थित सोय केली होती. लोकांना लग्नाची भेट म्हणून फुलं आणि रिटर्न गिफ्ट देण्यात येणार होते. परंतु लग्नाला बोलवून देखील कुणीच उपस्थित न राहिल्याने त्यांचे हजारो डॉलर्सचे नुकसान झाले दोघेजण बिचारे आपल्या लग्नाच्या हॉलमध्ये बसून रडले. रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यात येणाऱ्या सगळ्या भेटवस्तू तशाच रॅप करुन पडून राहिल्या. त्याचबरोबर, लग्नासाठी तयार केलेले जेवण वाया गेले आणि त्याहून वाईट म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस दु:ख आणि वेदना देणारा ठरला.