आपल्याकडे रस्त्यांवर खड्डे आहेत, खड्ड्यांतून वाट काढत जावं लागतंय, गाडी चालवताना याचा खूप त्रास होतो, यामुळे आपण तक्रार करत असतो. आपली तक्रारही निश्चितच ग्राह्य आहे. कारण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात तर होतातच, पण मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे वेगवेगळे त्रास पण होतात. सुविधा असूनही त्या अपुऱ्या असणं हे जसं एक वेगळंच दु:खं आहे, तसंच सुविधाच नसणं, यापेक्षा दुसरी मोठी गैरसोय नाही.. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (viral video) झाला आहे. यामध्ये गर्भवतीला दवाखान्यात नेण्यासाठी काय काय जीवघेणी कसरत करावी लागतेय, हे अगदी स्पष्ट दिसत आहे.
आज आपण ५ जी, ऑनलाईन अशा मोठ्या मोठ्या गोष्टी एकीकडे करतोय, पण दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात आजही रस्ते, पाणी या मुलभूत सुविधांसाठी लोकांना झगडावं लागतं. आजारी व्यक्तींना किंवा गर्भवती महिलांना खाटेवर टाकून दवाखान्यात नेण्याची वेळ आजही बहुतांश लोकांवर येते. त्याविषयीच्या बातम्याही नेहमीच आपण ऐकत असतो, बघत असतो. त्याच पठडीतला हा आणखी एक व्हिडिओ सध्या ग्रामीण भागातली भयावह अवस्था दाखवतो आहे. @Anurag_Dwary या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो भोपाळमधील (Bhopal) बेतूल- शहापूर येथील आहे.
शिक्षा-स्वास्थ्य को लेकर लगभग देश की तस्वीर है, फिलहाल उदारण बेतूल जिले के जामुनढाणा से जहांं पुल न होने से लोग प्रसूता को खटिया में डालकर अस्पताल ले जा रहे हैं, समस्या सालों से है समाधान कब मिलेगा पता नहीं. pic.twitter.com/4eV4PDRfbA
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) August 11, 2022
यामध्ये असं दिसत आहे की एका गर्भवती महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी तिच्या कुटूंबियांची अक्षरश: धडपड सुरू आहे. नदीला पूर आल्याने नदीपात्र अगदी दुथडी भरून वाहत आहे. दवाखाना नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. पण पुरामुळे तिकडे जाण्याची काहीही सुविधा नाही. ना एखादा रस्ता ना कोणते वाहन. अशा परिस्थितीत नातलगांनी त्या महिलेला एका बाजेवर झोपवले आहे, सगळ्यांनी मिळून बाज उचलली आणि चक्क कंबरेएवढ्या पाण्यातून वाट काढत ते तिला दवाखान्यात नेत आहेत... हा तिचा सगळा प्रवास अतिशय थरारक असून तिला सुखरूप दवाखान्यात पोहोचविणे, हे खरोखरंच त्या सगळ्यांसाठी एक आव्हान होते.