Join us  

5 फूट लांब केस असलेल्या बायकांचे एक गाव; असं काय खास आहे त्या गावच्या पाण्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 6:47 PM

एक गाव जिथल्या सर्वच महिलांचे केस 5 फुटापर्यंत लांब, दाट आणि काळेभोर . आपल्या लांब केसांची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा जपण्यासाठी येथील मुली महिला पारंपरिक उपाय करतात. हे असं चमत्कारिक गाव आहे कुठे?

ठळक मुद्देहुआंग्लुओ याओ गावातल्या महिलांना लांब केस म्हणजे आपली मोठी संपत्ती वाटतात.केस जपण्याची रेड याओ महिलांची एक विशिष्ट पध्दत आहे. या विशिष्ट पध्दतीमुळेच येथील मुली आणि महिलांचे केस लांब असतात असं मानलं जातं.रेड याओ महिला आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात ते लग्नाचं वय झालं आहे हे सांगण्यासाठी.

 लांब, दाट , काळ्याभोर केसांसाठी किती उपाय करावे लागतात; तरीही केस लांब होतीलच याची खात्री नाही. पण जगाच्या पाठीवर एक गाव आहे जिथे सर्वच महिलांचे केस 5 फुटापर्यंत लांब, दाट आणि काळेभोर असतात. इथे अपवादानेही महिलांना केसांच्या समस्या जाणवत नाही. आपल्या लांब केसांची हजारो वर्षांपूर्वीची परंपरा जपण्यासाठी येथील मुली महिला पारंपरिक उपाय करतात.  हे असं चमत्कारिक गाव आहे कुठे?

Image: Google

हे गाव आहे चीन या देशातलं. दक्षिण चीन मधील गुईलिन शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असलेलं  जिंशा नदीकठी वसलेलं हुआंग्लुओ याओ नावाचं हे गाव. आजूबाजूला  मोठमोठ्या पर्वतरांगा, देखणा निसर्ग हे या गावाचं वैशिष्ट्य. पण हे गाव अति दुर्गम असल्यानं 2002 पर्यंत तिथे पर्यटक सहजासहजी जाऊ शकत नव्हते. पण चीन सरकारनं पर्यटन सुधारणा राबवल्या आणि या गावात जाण्याचा मार्ग पर्यटकांना उपलब्ध झाला. जगभरातले पर्यटक हुआंग्लुओ याओ या गावात जावू लागले आणि या गावाची चर्चा जगभर व्हायला लागली. या या गावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 'मध्ये आहे ती या गावातील महिलांच्या लांब केसांमुळे. हुआंग्लुओ याओ या गावातील सर्वच महिलांचे केस 5 फुटापर्यंत लांब असातात. नुसते लांबच नाही तर दाट, काळेभोर आणि रेशमी केस. आज जगहरातल्या लोकांना इथल्या महिलांच्या केसांचं कौतुक आणि कुतुहल वाटतं. 

Image: Google

हुआंग्लुओ याओ गावातल्या महिलांना लांब केस म्हणजे आपली मोठी संपत्ती वाटतात. लांब केस म्हणजे दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. लांब दाट केस असालेल्ल्या या महिला रेड याओ या आदिवासी समुहाच्या आहे. हा आदिवासी समूह क्विन राजवंशाचा मानला जातो. याओ लोकांना रेड नाव त्यांच्या लाल पेहरावामुळे पडलं. येथील महिला सणावाराला, गावाच्या स्थानिक उत्सवात लाल रंगाचे हाताने विणलेले जॅकेट आणि पुरुष लाल शर्ट घालतात.

रेड याओ महिला आपली लांब केसांची परंपरा एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे अशी वर्षानुवर्षं सोपवत  असतात.  या हजारो वर्षांच्या  लांब केसांच्या परंपरेत एकदाही खंड पडलेला नाही. हे केस जपण्याची रेड याओ महिलांची एक विशिष्ट पध्दत आहे. या विशिष्ट पध्दतीमुळेच येथील मुली आणि महिलांचे केस लांब असतात असं मानलं जातं.

Image: Google

रेड याओ महिला रोज नदीच्या पाण्यानं केस धुतात. पण आठवड्यातल्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्या एक विशिष्ट मिश्रण लावून केस धुतात. हे मिश्रण म्हणजे आंबवलेल्या तांदळाचं पाणी असतं. हे तांदळाचं पाणी पोमेलो नावाच्या फळाची साल आणि चहाच्या वनस्पतीच्या बियांचं तेल घालून उकळलं जातं.  हे मिश्रण या महिला आपल्या केसांवर टाकतात. मग लाकडी कंगव्याच्या सहाय्याने हे मिश्रण केसाच्या मुळापासून खाली टोकापयंत पसरवलं जार्तं. या विशिष्ट प्रकारे केस धुतल्यानेच येथील महिलांचे केस लांब तर असतात. शिवाय ते काळेभोर राहातात.

Image: Google

लांब केसांच्या या रेड याओ महिलांच्या केसांशी निगडित परंपराही खूप रंजक आहेत. लग्न न झालेल्या मुली डोक्यावर पगडी घालतात. लग्न झाल्याशिवाय केस चारचौघत दाखवू नये अशी इथली परंपरा. ज्या महिलांचं लग्न झालं आहे त्या महिला आपल्या कपाळाभोवती केस गुंडाळतात. कपाळाभोवती केस गुंडाळलेल्या महिला म्हणजे लग्न झालेल्या पण मूल नसलेल्या. तर मूल झालेल्या महिला आंबडा घालतात. रेड याओ महिला वयाच्या अठराव्या वर्षी केस कापतात. आयुष्यात त्या फक्त एकदाच केस कापतात ते लग्नाचं वय झालं आहे हे सांगण्यासाठी. आयुष्य पुढे बदलणार आहे हे सांगण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी या महिला आपले केस कापतात. कापलेले केस ते टाकून देत नाही तर पुढे लग्न झाल्यावर  गुंडाळलेल्या केसात हे केस विणून अडकवण्याची पध्दत आहे.

Image: Google

चीनमधलं हुआंग्लुओ याओ हे गाव येथील निसर्ग सौंदर्यामुळे जसं प्रेक्षणीय झालं आहे तसंचे येथील महिलांच्या केश सौंदर्यामुळेही जगात चर्चेचा विषय झाला आहे. या गावात पर्यटक फिरताना कुतुहलानं इथल्या महिलंशी बोलू बघतात तेव्हा या महिला पर्यटकांना आग्रहानं घरी नेऊन येथील वैशिष्ट्यपूर्ण चहा देखील पाजतात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलचीनकेसांची काळजीमहिला