कामानिमित्त किंवा कधी फिरायला आपण सगळेच हायवेचा वापर करतो. हायवे म्हटला की टोल देणे ओघानेच आले. काही टोल नाक्यांवर टोल माफ केल्याची घोषणा केली असली तरी अद्याप याठिकाणी टोल माफ करण्यात आलेला नाही. हे एक कारण असले तरी कधी सुट्टे पैसे नाहीत म्हणून, पैसे द्यायला वेळ लावला म्हणून किंवा आणखी ना काही कारणाने होणारे वाद नेहमीचेच. फास्टटॅगमुळे हे कमी झाले असले तरी अशाप्रकारची दृश्ये आजही पाहायला मिळतातच. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एक पुरुष टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे (Viral Video Man Hitting Women on toll Plaza).
ही घटना मध्य प्रदेशमधील असून एक पुरुष या व्हिडिओमध्ये महिलेला कानाखाली देताना दिसत आहे. राजगढ-भोपाळ मार्गावर कचनारिया टोल प्लाझावर ही घटना घडली. या ठिकाणी असलेल्या महिलेने टोन न देता जाण्यास मनाई केल्याने या व्यक्तीला राग आला आणि तिने महिलेला कानाखाली मारली. विशेष म्हणजे अशाप्रकारे मारहाण झाल्यावर ही महिला घाबरली नाही. उलट तिने आपल्या पायातील चप्पल काढून त्या व्यक्तीला भरपूर मारले. त्याचवेळी या महिलेच्या बूथमध्ये असलेली आणखी एक महिला तिच्या मदतीसाठी आली तर टोल नाक्यावर असलेले काही पुरुष या दोघांमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी आल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्याने नेमके काय घडले हे काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले.
A man slapped a woman employee of a toll both in Rajgarh after she refused to let him go without paying the tax. The man is seen angrily walking towards the employee and then slapping her across the face, The woman hits him back with her footwear @ndtv@ndtvindiapic.twitter.com/hmK0ghdImX
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) August 21, 2022
एक व्यक्ती या मार्गावरुन गाडी घेऊन जात होता. आपण स्थानिक आहोत त्यामुळे आपल्याला टोलमधून सूट मिळायला हवी असे या व्यक्तीचे म्हणणे होते. आता तो स्थानिक आहे हे जरी ठिक असले तरी ते सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेच कागदपत्र नव्हते. यावेळी टोल कर्मचारी महिलेने याबाबत आपल्या सुपरवायजरला सांगितले. मात्र आपण या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितल्यावर हा व्यक्ती आपल्या गाडीतून बाहेर आला आणि त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मारलेही. या महिलेने सांगितले की टोल नाक्यावर कामासाठी ७ महिला असून त्यांच्या सुरक्षेची कोणतीही सुविधा याठिकाणी नाही. या घटनेनंतर सदर व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करण्यात आला मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.