महिलेची प्रसूती ही एकप्रकारे गुंतागुंतीची प्रक्रिया असते. एका जीवाला जन्म देणे म्हणजे त्या महिलेसाठीही तो दुसरा जन्मच असतो असे म्हणतात. काहीवेळा अचानक प्रसूतीकळा सुरू होतात आणि चालत्या ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर प्रसूती झाल्याच्या घटना आपण ऐकतो. इतकेच नाही तर कधीतरी विमानातही अचानक प्रसूती झाल्याच्या घटना आपण ऐकतो. अशाप्रकारे कित्येक हजार फूटांवर हवेत जन्म घेणारे बाळ निराळेच म्हणावे लागेल. इथपर्यंत सगळे ठिक आहे, पण आता इतके हजार फूट उंचीवर जन्म झालेले बाळ नेमक्या कोणत्या देशाचे नागरीक होणार हा प्रश्न आपल्याला कदाचित पडणार नाही. पण नुकत्याच झालेल्या एका घटनेत बाळाच्या आईला हा प्रश्न पडला (Baby Born in Airplane Got USA Citizenship According to American Rule).
त्याचे झाले असे, की अमेरिकेत कनेक्टीकट प्रांतात राहणाऱ्या २१ वर्षाच्या केंड्रीया नावाची तरुणी ३२ आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या प्रसूतीसाठी केवळ १ आठवडा बाकी असल्याने ती आपल्या बहिणीसोबत अमेरिकेहून डोमनिकन रिपब्लिक येथे जात होती. विमानाने प्रवास करण्यासंदर्भात केंड्रियाने आपल्या डॉक्टरांची परवानगी घेतली होती. त्यांच्या परवानगीनंतरच केंड्रीया विमानाने प्रवास करत होती. मात्र प्रवासादरम्यान विमान जेव्हा सर्वाधिक उंचीवर होते तेव्हा तिला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. तिची बहीण आणि विमानातील कर्मचारी तिला विमानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेले. याठिकाणी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव केंड्रीयाने स्कायलेन असे ठेवले. डोमनिकन रिपब्लिक याठीकाणी पोहोचल्यावर केंड्रीयाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर आणि बाळावर आवश्यक ते उपचारही करण्यात आले.
आता आपली मुलगी विमानात म्हणजेच आकाशात जन्माला आली असल्याने नागरीकत्त्व कोणते असा प्रश्न स्वाभाविकच केंड्रीयाला पडला होता. आपण एका देशातील आणि आपले मूल वेगळ्या देशातील नागरीक हे केंड्रीयाला काहीसे अजब वाटत होते. मात्र अमेरीकन नागरीकत्त्वाच्या नियमांनुसार या बाळाला अमेरिकन नागरीकत्त्व मिळू शकते असे सांगण्यात आले. अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांनी केंड्रीयाच्या या शंकेचे निरसन केल्याने ती भलतीच खूश झाली.