बँकेमध्ये आपण अनेकवेळा जातो, काही कर्मचारी मदतीला धावून येतात तर, काही कामाच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही मदत करत नाही. सध्या एका बँकेमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल आहे याची खातरजमा करण्यात आलेली नाही. बँकेतले अनुभव म्हणून तो सोशल मीडियात शेअर होत आहे.
तर, ही घटना घडली मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बँक ऑफ बडोदा, चारकोप या ब्रांचमध्ये. अर्पिता शहा नामक महिला बँक ऑफ बडोदा येथे काही बँकेच्या कामानिमित्त गेली होती. तिची आई याआधी बँकेमध्ये पासबुक अपडेट करण्यासाठी गेली होती. जेव्हा तिची आई घरी आली तेव्हा तिला असे कळले की, पासबुकमध्ये दुसऱ्या खात्यातील व्यवहार छापण्यात आले आहे.
ते सुधारण्यासाठी अर्पिता व तिची आई पुन्हा बँकेमध्ये गेली. ती शाखा व्यवस्थापक अजित यांना भेटली, त्याने तिला जॉइंट मॅनेजरकडे नेले. या प्रकरणाबद्दल संयुक्त व्यवस्थापक एलिझाबेथशी सल्लामसलत केल्यानंतर, अर्पिताला तिच्याकडून असभ्य उत्तर मिळाले ती म्हणाली, "ही मशीनची चूक आहे, कर्मचार्यांची चूक नाही". त्यानंतर एलिझाबेथ पुढे काहीही ऐकून घ्यायला तयार न्हवती.
ती वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून अर्पिताने व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्यात अर्पिता महिला कर्मचाऱ्याला वारंवार पासबुकसंदर्भात विचारताना दिसून येत आहे. गोष्टी रेकॉर्ड केल्या जात असल्याचे पाहून, एलिझाबेथने अर्पिताला मारहाण केली आणि फोन हिसकावून फेकला. या झटापटीत अर्पिताच्या हातावर नखांच्या खुणा उठल्या आहेत.
यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि दोघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरही एलिझाबेथने माफी मागण्यास आणि अर्पिताच्या फोनची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडितेने तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली असून, व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर केला.