कोणतंही लहानसं दुखणं- खुपणं अंगावर काढू नये, हेच खरं.. कारण त्यातून कधी काय होऊ शकेल, हे काही सांगता येत नाही. आता आपलंच पहा ना.. सर्दीचा त्रास अनेक जणांना असतो. पण साधी सर्दीच तर आहे, होऊन जाईल आपोआप बरी असं म्हणत आपण सर्दीकडे दुर्लक्ष करतो. अनेक जण तर सर्दी झाली की मनानेच औषधं घेऊन मोकळेही होऊन जातात. पण असं करू नका. सर्दी झाल्यावर असे मनाने प्रयोग करत असाल आणि सर्दीचं दुखणं हलक्यात काढत असाल तर या महिलेसोबत काय झालं ते एकदा वाचाच (lost her memory of past 20 years).. एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात शोभावी अशीच तिची गोष्ट आहे.
ही गोष्ट आहे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या क्लेअर मफेट या मैत्रिणीची. नवरा आणि दोन मुलं असं तिचं कुटूंब. तिचा हा आजार खरोखरंच अचंबित करणारा असून तिने काही दिवसांपुर्वीच तिच्या या आजाराबाबत एका कार्यक्रमात खुलासा केला होता. द सन यांनी दिलेल्या वृत्तानुसार क्लेअरचा पती स्कॉट याने सांगितले, की क्लेअरला एक दिवस खूप सर्दी झाली. तिला सर्दी होण्याच्या आठवडाभर आधी त्यांच्या छोट्या मुलाला सर्दी झाली. त्याचंच इन्फेक्शन क्लेअरला झालं. सुरुवातीला क्लेअरने सर्दीच तर आहे, म्हणत दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर मात्र तिची तब्येत बिघडत गेली आणि ती खूप सुस्त होत होती. तिला खूप थकवा येत होता.
एका रात्री ती झोपली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला जागच आली नाही. स्कॉटने तशा अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासले आणि तातडीने व्हेंटिलेटर लावले. त्यानंतर झालेल्या तपासणीतून असे लक्षात आले की तिला एन्सेफलाइटिस हा आजार झाला होता. बरेच औषधोपचार केल्यानंतर ती शुद्धीत तर आली पण ती तिच्या आयुष्यातले काही वर्ष पुर्णपणे विसरून गेली होती. नवरा, मुलं या सगळ्यांना ती आता आपलं मानते. पण लग्न कधी झालं, मुलं कधी झाली, त्यांची शाळा, त्यांचे वाढदिवस हे सगळं तिला अजूनही आठवत नाही.