बिग बी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयामुळे तर चाहत्यांचे लाडके आहेतच. पण त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा कोणत्याही कार्यक्रमातील वावर एकूणच अतिशय साधा, सोपा आणि सामान्यांच्या जवळ जाणारा असल्याने या वयातही त्यांचे फॅन फॉलोईंग अजिबात कमी झालेले नाही. उतारवयात एक विशिष्ट टप्पा पार केला की साधारणपणे लोक निवृत्ती घेतात आणि आराम करण्याला प्राधान्य देतात. पण बिग बी आजही आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही ते बरेच अॅक्टीव्ह असल्याने सतत काही ना काही पोस्ट करत असतात. अमिताभ बच्चन यांची अभिनेते म्हणून जशी इमेज आहे तशीच फॅमिली मॅन म्हणूनही ते आयडीयल असल्याची इमेज आहे. या गोष्टीचा प्रत्यय येण्याचे कारण म्हणजे त्यांनी नुकताच आपल्या संपत्तीबाबतचा घेतलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय (Abhishek Bachchan and Shweta Nanda to get equal share from Amitabh Bachchan's Property).
खासगी असला तरी अमिताभ बच्चन यांनी अतिशय आदर्श असा एक निर्णय नुकताच जाहीर केला आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांना अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा ही २ मुले असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी आपली मुलगी श्वेता हिला भेट म्हणून प्रतिक्षा बंगला तिच्या नावावर केल्याचे समजले आणि सोशल मिडीयात याची जोरदार चर्चा झाली. रिपोर्टसनुसार १६ हजार ८४० स्क्वेअर फूट असलेल्या या बंगल्याची किंमत ५०.६३ कोटी इतकी आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी अमिताभ ३३९० कोटींचे मालक आहेत. सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळख असल्याने अमिताभ यांच्या संपत्तीचा आकडा मोठा आहे. एका चित्रपटासाठी ते १५ ते २० कोटी इतके मानधन घेत.
T 2449 - #WeAreEqual .. and #genderequality ... the picture says it all !! pic.twitter.com/QSAsmVx0Jt
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 1, 2017
२०१७ मध्ये अमिताभ यांनी आपल्या संपत्तीच्या वाटणीबाबत एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. यामध्ये माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीचे माझा मुलगा आणि मुलगी यांच्यात समान वाटप केले जाईल असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांची ही पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटीझन्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. मात्र मुलगा आणि मुलगी यांना समान दर्जा दिल्याबद्दल बऱ्याच जणांनी अमिताभजींचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये ऐश्वर्याबद्दल त्यांनी काहीच न बोलल्याने तिच्याबाबत काय असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे.Weareequal, Genderequality असे हॅशटॅगही या पोस्टमध्ये वापरण्यात आले आहेत.