मॉडेल, अभिनेत्री हिना खान म्हणजे छोट्या पडद्यावरचं एक मोठं नाव. हिना आणि तिची स्टाईल यांची नेहमीच चर्चा असते. काही वर्षांपूर्वी तिची मालिका तर एवढी हिट झाली होती की, हिनापेक्षा 'अक्षरा' म्हणूनच ती जास्त ओळखली जायची. यावरूनच तिची लोकप्रियता लक्षात येते. महिला वर्गातही हिनाची प्रचंड क्रेझ होती. तिचं हसणं, तिचं दिसणं हा तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता एवढ्या सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्रीला कोण कशासाठी नाही म्हणेल, असं आपल्याला वाटतं. पण आपला हा विचार चुकीचा आहे. यासंदर्भात हिनाने नुकताच एक खुलासा केला असून केवळ सावळ्या रंगामुळे तिलाही नकार पचवावा लागला आहे.
गोरा रंग की सावळा, असा वाद खरंतर आता राहायलाच नको, एवढी आजची स्त्री बदलली आहे. पण तरीही सर्वसामान्य मुलींना आणि चक्क सावळ्या वर्णाच्या अभिनेत्रींनाही त्यांच्या रंगामुळे अनेक क्लेषकारक प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील सावळ्या रंगामुळे आलेला तिचा अनुभव सोशल मिडियावर शेअर केला होता. असंच काहीसं अभिनेत्री नंदिता दास हिने देखील काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. चित्रपट सृष्टीत कधी- कधी असे प्रसंग येतात, जेव्हा तुम्ही किती चांगल्या अभिनेत्री आहात, यापेक्षा तुमच्या रंगाला अधिक महत्त्व मिळतं, हे आजवर अनेकींच्या सांगण्यातून आलं आहे. तेच दु:ख आता सांगते आहे हिना खान.
टीनएज मुली याबाबतीत खूपच संवेदनशील असतात. आपलाही रंग उजळ असावा, असं त्यांना मनोमन वाटत असतं. पण गोऱ्या रंगाच्या मागे लागण्यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक करा. कारण व्यक्तिमत्वात असणारं सौंदर्य तुमचा रंग गोरा आहे की सावळा यापेक्षाही खूप जास्त वरचढ ठरतं. गोरी असो अथवा काळी, सावळी असो किंवा गव्हाळ, जाड असो किंवा बारीक, उंच असो अथवा बुटकी... आत्मविश्वास, हिंमत आणि हुशारी हे तीन गुण असतील, तर कोणतीही स्त्री सुंदरच दिसते.
बिपाशा बसू, नंदिता दास, काजोल अशा सावळ्या रंगाच्या अनेक अभिनेत्रींनी स्वत:च स्थान निर्माण केलं आहे आणि ते अढळ ठेवलं आहे. हिनाचं देखील असंच काहीसं आहे. सावळ्या रंगामुळे आलेला अनुभव सांगताना हिना म्हणाली की काही वर्षांपुर्वी एक प्रोजेक्ट सुरु होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये काश्मिरी मुलीचे एक पात्र होते. यासाठी ऑडिशन द्यायला जेव्हा हिना गेली होती, तेव्हा स्क्रिन टेस्ट उत्तम होऊनही हिनाला या भूमिकेसाठी डावलण्यात आलं. तिला डावललं जाण्याचं कारण होतं तिचा सावळा रंग.
हिना म्हणाली आजही हा प्रसंग आठवला तर खूप वाईट वाटतं. मी मुळात एक काश्मिरी मुलगीच आहे. मला ती भाषाही चांगली येते. त्यामुळे ही भूमिका मी खूपच चांगल्याप्रकारे साकारेल, याविषयी मला आत्मविश्वास होता. मी चांगला अभिनय करेल, हे त्या प्रोजेक्टच्या टीमलाही माहिती होतं. पण मी सावळी असल्याने मी काश्मिरी मुलगी म्हणून शोभणार नाही, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला नकार कळवला. या प्रसंगाने मला खूप वाईट वाटलं, पण तरीही मी हिंमत हरले नाही आणि माझा आत्मविश्वासही डगमगू दिला नाही, असंही हिनाने आवर्जून सांगितलं.