दिवाळी आली की घरोघरी साफसफाई सुरु होत असते. अगदी अंगणापासून ते स्वयंपाकघर आणि घरातले सगळे माळे, पोटमाळे देखील झाडून पुसून लख्ख केले जातात. घर आवरायचं म्हणजे सगळ्यात आधी तर माळ्यांवरच, कपाटातलं, दिवाणाच्या बॉक्समधलं, घरातल्या छोट्या छोट्या कप्प्यांमधलं असं सगळं सामान बाहेर काढलं जातं. हे सामान एकदा बाहेर आलं की सामानाचं सॉर्टिंग करणं हे एक मोठं जिकीरीचं काम. हे करताना आपण सहसा सामानाचे दोन भाग करतो. एक भाग जे सामान लागतं त्याचा आणि दुसरा भाग आपल्याला जे सामान लागत नाही त्याचा. न लागणारं सामान घराबाहेर टाकून देणं हे दिवाळीच्या दिवसातलं सगळ्यात अवघड काम.
सामान्यपणे बहुतांश महिलांचं असं असतं की त्यांना त्यांच्या घरातली अगदी एवढीशी चिंधी देखील चटकन टाकून द्यावी वाटत नाही. आता नाही लागलं तर नंतर कधीतरी लागेल, असं म्हणत म्हणत कधीही न लागणाऱ्या असंख्य वस्तू पुन्हा जशाला तशा ठेवून दिल्या जातात. असं केल्यामुळे घर आवरण्याचा काहीच उपयोग होत नाही. असंच काहीसं झालं आहे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिचं.
कोण म्हणतं हिरॉईन्स काही दिवाळीला घर आवरत नाहीत म्हणून. अभिनेत्री म्हणजे काय बुवा मस्त छान छान कपडे आणि दागिने घालायचे आणि दिवाळीला मिरवायचं, असं त्याचं आयुष्य असतं.... हा बहुतांश सर्वसामान्य लोकांचा समज. पण हा समज किती चुकीचा आहे आणि अभिनेत्रींनाही दिवाळी आली की कसं सर्वसामान्य महिलांप्रमाणे घर आवरावं लागतं, हे जुहीने नुकतीच एक पोस्ट शेअर करून दाखवून दिलं आहे.
जुही चावला हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये जुही चावला तिचं घर आवरताना दिसते आहे. 'दिवाली स्वच्छता अभियान' असं लिहूनच जुहीने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये जुही अतिशय हॅप्पी मुडमध्ये असून घरात तिच्यासोबत आणखी तीन जण साफसफाई करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये जुहीच्या घरातल्या देवघराची साफसफाई सुरु आहे असं दिसतं. एक जण देवघर स्वच्छ करताना दिसत आहे, दुसरे दोघे जण कपाटातून काही वस्तू काढून त्या पुसण्यात दंग आहेत. घरभर अनेक वस्तू विखुुरलेल्या दिसत असून जशी सर्वसामान्य घरात साफसफाई सुरु असते, तशाच प्रकारची सगळी जय्यत तयारी जुहीच्या घरीही दिसत आहे. जुही चावला तिचं हे 'दिवाली स्वच्छता अभियान' मस्त एन्जॉय करताना दिसत आहे.
हा फोटो शेअर केल्यानंतर जुहीने एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणते आतापर्यंत सर्व न वापरलेल्या, सांभाळून, जपून ठेवलेल्या वस्तू आहेत. पण त्या फेकून द्याव्या वाटत नाहीत कारण एक ना एक दिवस त्या मला नक्कीच उपयोगात येतील असं वाटतं. खरंतर या वस्तूंचा काही उपयोग नाही हे मला कळतंय, पण तरीही त्या पुन्हा मी जशास तशा ठेवून देत आहे. तिच्या या भावना कोणत्याही सर्वसामान्य भारतीय महिलेशी अगदी मिळत्या- जुळत्या आहेत. म्हणूनच तर सर्वसामान्य गृहिणी असो किंवा मग जुही चावलासारखी अभिनेत्री. प्रत्येकीचाच आपल्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या वस्तूवर जीव जडलेला असतो. त्यामुळे वस्तू फेकायच्या म्हंटलं की जीव अगदी नकोसा होऊन जाताे. तुमच्या घरीही जुहीच्या घरासारखंच सगळं चालू असेल, अडगळीच्या प्रत्येक वस्तूत जीव गुंतला असेल. नाही का?