Join us  

इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 5:48 PM

15 kg Weight Gain : अजिबातच सोपा नव्हता तो प्रवास.. १५ किलो वजन वाढवून तेवढेच पुन्हा कमी करणे. पण यापेक्षा जास्त कठीण झाले होते लोकांचे टोमणे सहन करणे.... असं का म्हणतेय निमरत? (Nimrat Kaur) असं काय नेमकं अनुभवलंय तिने?

ठळक मुद्दे.......अशाच लोकांनी माझं वाढतं वजन पाहून मला सल्ले द्यायला सुरुवात केली. मी काय खावं, काय नाही इथपासून ते कधी आणि कुठे खावं हे देखील लोक मला सांगू लागले.

अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या 'दसवी' चित्रपटात अभिनेत्री निमरत कौरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. व्यक्तिरेखेची गरज म्हणून तिने तब्बल १५ किलो वजन वाढविले आणि तेवढेच पुन्हा कमी केले. एकूण १० महिन्यांचा तिचा हा प्रवास. पण हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून गेला. मानसिक आणि भावनिक स्तरावर अनेकदा कुमकुवत करून गेला अशा शब्दांत निमरतने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.. (movie Dasvi)

 

एखाद्या व्यक्तीचं वजन वाढू लागलं किंवा कमी होऊ लागलं की त्यासोबतच तिला सल्ले देणाऱ्या लोकांची संख्याही वाढू लागते. असाच काहीसा अनुभव निमरतलाही आला आहे. तिने तिचं वाढलेलं वजन आणि नंतर पुन्हा केलेला वेटलॉस असे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केले आहेत. ''Weigh on it…Swipe left for my thousand words this picture won’t speak.'' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं असून त्यानंतर या १० महिन्यांच्या प्रवासात तिला लोकांकडून आलेले अनुभव, ट्रोलिंग आणि त्याचा होणारा त्रास असं सगळं नमूद केलं आहे. 

 

निमरत म्हणते भुमिकेची गरज म्हणून मी वजन वाढवत होते. पण एखाद्या व्यक्तींची उंची, वजन, रंग कसा असावा, याचे ठोकताळे काही लोकांच्या मनात इतके फिक्स असतात की त्याचा त्रास होऊ लागतो. अशाच लोकांनी माझं वाढतं वजन पाहून मला सल्ले द्यायला सुरुवात केली. मी काय खावं, काय नाही इथपासून ते कधी आणि कुठे खावं हे देखील लोक मला सांगू लागले. वाढत्या वजनामुळे मला सतत ट्रोल केलं जाऊ लागलं. मी म्हणजे अनेक लोकांसाठी एक चेष्टेचा विषय झाले होते. माझ्यावर सर्रास जोक मारले जायचे. या सगळ्या गाेष्टींमुळे आपला फोकस ढळू न देणं हे मोठं आव्हान होतं.

 

या सगळ्या प्रवासाने मला एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून हे शिकवलं की आपण आणि आपलं काम या दोन गोष्टी महत्त्वाच्या. तुम्ही कसे आहात, कसे दिसता हे तुम्ही ठरवा. तुम्ही आणि तुमचं शरीर यामध्ये तिसऱ्या कुणाला येऊ देऊ नका. एखाद्या व्यक्तीने शारिरीक दृष्ट्या कसं असावं, याचे जे काही नियम लोकांनी डोक्यात फिक्स ठेवले आहेत, त्या चौकटीत न बसणाऱ्या लोकांना थोडी सहानुभुती, थोडं प्रेम, थोडा आपलेपणा दिला पाहिजे. त्यांना सल्ला देऊन त्यांच्यावर विनोद करण्यापेक्षा त्यांना समजून घ्या. जर तुम्ही कुणासाठी काही चांगलं करू शकत नाही, तर निदान त्यांचा दिवस खराब तरी करू नका, असंही निमरतने सुनावलंय.

 

टॅग्स :सोशल व्हायरलनिमरत कौरइन्स्टाग्रामवेट लॉस टिप्ससेलिब्रिटी