तालिबाननेअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर या देशातील नागरिकांची स्थिती अतिशय भीषण झाली आहे. अन्नासाठी त्यांच्यावर स्वत:च्या पोटच्या मुली विकण्याची परिस्थिती ओढावली आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचे सगळ्यात जास्त हाल होताना दिसत आहेत. सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, तालिबान्यानीअफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर येथील अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. परंतु जे विस्थापित होऊ शकले नाहीत त्यांचा रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळली असून अन्नासाठी येथील जनतेवर बिकट परिस्थिती ओढावल्याचे चित्र आहे. इतर सगळे मार्ग संपल्यावर येथील लोक आपल्या मुलींची विक्री करणे किंवा पैसे घेऊन त्यांचे लग्न लावून देणे या पर्यायावर पोहोचले आहेत. एका वडिलांनी कुटुंबातील इतर लोकांना अन्न मिळावे यासाठी आपल्या ९ वर्षाच्या लहानग्या मुलीची विक्री केल्याचा व्हिडियो नुकताच सीएनएनने प्रसारित केला. त्यामुळे परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
सध्या शाळा बंद असल्याने मुलींचा व्यवहार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाप्रकारे विक्री झालेल्या मुलींवर अत्याचार होत असल्याचेही समोर येत आहे. मुली विकल्याच्या मोबदल्यात त्यांच्या पालकांना पैसे, जमीन, शेळ्या यांसारख्या गोष्टी देण्यात येत आहेत. काही कुटुंबातून एकापेक्षा जास्त मुली विक्री होत असल्याचेही चित्र आहे. सीएनएनच्या व्हिडियोनुसार ९ वर्षांची एक मुलगी आपले छान आवरताना दिसत आहे. मोठेपणी शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहत असलेली परवाना आणि तिचे कुटुंबिय घरच्या बिकट परिस्थितीपुढे हतबल असल्याचे दिसते. या मुलीचे नाव परवाना असून तिच्या आजुबाजूला तिची भावंडेही आहेत. आपल्या घरात खायला काहीही नसल्याचे ती या व्हिडियोमध्ये सांगत आहे. ही व्यक्ती मला मारहाण करेल की काय याची मला भिती वाटते असे परवाना म्हणते.
काही वेळाने एक ज्येष्ठ व्यक्ती तिला घेण्यासाठी येत असल्याचे दिसते. मग ही व्यक्ती या मुलीच्या वडिलांना पैसे देते आणि या मुलीला घेऊन जाताना दिसते. मुलीची काळजी घ्या असे या मुलीचे वडील या ज्येष्ठ व्यक्तीला सांगतात, तेव्हा हो आम्ही नक्कीच तिची काळजी घेऊ असे ते म्हणतात. या मुलीला नेत असताना ती या व्यक्तीसोबत जाण्यास विरोध करताना दिसते. मात्र तिला जबरदस्तीने ओढून नेले जाते. त्यामुळे अफगाणिस्तानातील हे भयाण सत्य अंगावर काटा आणणारे आहे. परवानाचे वडील अब्दुल मलिक म्हणतात काही दिवसांपूर्वीच आम्ही १२ वर्षांच्या एका मुलीला विकले आता हिला विकत आहोत. अशाप्रकारे पोटच्या मुली विकाव्या लागत असल्याने मला अतिशय अपराधी वाटत असून मी आतून पार तुटून गेलो आहे असे परवानाचे वडील म्हणतात. परंतु सध्या त्यांच्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबातील इतर लोकांना खायला घालायचे असल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे.