मूल होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठीही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. अनेकदा मूल होत नाही म्हणून बरीच जोडपी निराशेत असलेली आपण आजुबाजूला पाहतो. लग्नानंतर काही वर्षात मूल व्हावं यासाठी घरातील मंडळीही जोडप्याच्या मागे लागतात. पण मूल होतच नसेल तर मग वैद्यकीय उपचारांचा आधार घेऊन गर्भधारणा केली जाते. या सगळ्या प्रक्रियेत होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ताण अनेकदा जोडप्यांना न झेपणारा असतो. पण लग्नाला ७ वर्ष होऊनही घरात पाळणा हलत नाही म्हणून चिंतेत असणाऱ्या एका महिलेने एक दोन नाही तर चक्क ५ बाळांना एकावेळी जन्म दिला. जयपूरमध्ये ही घटना घडली असून अशाप्रकारे ५ बाळे होणे हे अतिशय दुर्मिळ असून वैद्यकीयदृष्ट्याही काहीसे गुंतागुंतीचे असल्याचे म्हटले जात आहे (Woman Delivers 5 Babies in Jaipur).
या ५ जणांमधील २ मुले आणि ३ मुली असून यातील एकाचा मृत्यू झाला. ४ ही बाळे कमी वजनाची असून सध्या त्यांना नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या बाळांचे वजन १ ते १.५ किलोच्या दरम्यान असल्याचे रुग्णायलातील डॉक्टरांनी सांगितले. लग्नानंतर रुकसाना यांचा २ वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर लग्नाला ७ वर्ष झाल्यावर त्यांना गर्भधारणा झाली. सातवा महिना असतानाच त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांनी ५ बाळांना जन्म दिला. डॉक्टरांनी अतिशय नाजूकपणे ही गर्भधारणा पार पाडली असली तरी त्यातील एक बाळ दगावलेच.
याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये बिहारमध्ये एका महिलेने असाच एकावेळी ५ बाळांना जन्म दिला होता. तर एप्रिल २०२० मध्येही लखनौमध्ये एका महिलेने अशाचप्रकारे एकावेळी ५ बाळांना जन्म दिल्याची घटना घडली होती. तर आफ्रिकेमध्ये २०२१मध्ये एका महिलेने एकावेळी १० बाळांना जन्म दिल्याचा दावा केला होता. यामुळे तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचेही सांगण्यात आले होते. जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म देणे काहीसे सामान्य असले तरी अशाप्रकारे एकावेळी ५ बाळांना जन्म देणे काहीसे दुर्मिळच म्हणावे लागेल.