कोविडनंतर अनेकांची आयुष्ये पालटली, बॉलिवूड क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोविड झाल्याने तेही यापासून दूर नव्हते. प्रसिद्ध अभिनेत्री दिपिका पदुकोण हिलाही कोविड झाला होता, या आजारानंतर आपले आयुष्य पूर्णपणे बदललं असं नुकतंच दिपिकाने स्पष्ट केलं. कोरोना काळात आपल्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याबाबत दिपिकाने नुकतेच भाष्य केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिपिका पदुकोण आणि तिच्या कुटुंबियांना कोरोना झाला होता. पण त्यातून बाहेर आल्यावर आम्हाला गोष्टी ओळखण अवघड जात होते, याचे कारण म्हणजे आम्ही शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त झालो होतो असे दिपिका म्हणाली.
दिपिका म्हणते, कोरोनाशी लढताना सुरु असलेला शारीरिक आणि मानसिक लढा खूप काही शिकवून गेला. अशक्तपणा, औषधोपचार यांमुळे या आजारातून बरे झाल्यावर काही दिवस माझा मेंदू काम करत नसल्याचे मला जाणवले. त्यामुळे मी कामातून २ महिने पूर्णपणे ब्रेक घेतला होता. या आजाराने माणूस म्हणून मला पूर्णपणे बदलून टाकले आहे. पहिला लॉकडाऊन हा खूप खूप वेगळा होता. आपल्या प्रत्येकासाठीच आपल्यावर ही कोणती परिस्थिती उद्भवली असा भाव होता. पण दुसरी लाट ही माझ्यासाठी खूपच वेगळी होती कारण माझ्या कुटुंबातील सगळ्या व्यक्ती एकाच वेळी कोरोनाबाधित होत्या. मला देण्यात आलेली औषधे बहुदा स्टीरॉईड्स होती, त्यामुळे त्या काळात मला काही त्रास झाला नाही, पण नंतर माझे शरीर आणि मेंदू वेगवेगळ्या स्तरावर काम करत असल्याचे मला अनेकदा जाणवले.
पहिली लाट आली तेव्हा दिपिका आणि रणवीर त्यांच्या मुंबईतील घरी होते. मात्र दुसऱ्या लाटेच्या वेळी हे दोघेही दिपिकाच्या घरी बंगलोरला दिपिकाच्या पालकांसोबत राहत होते. नुकत्यात प्रदर्शित झालेल्या ८३ या चित्रपटात दिपिका झळकली आहे. यामध्ये तिने कपील देव यांची पत्नी असलेल्या रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय नाग अश्विनच्या चित्रपट प्रोजेक्ट ‘बैजू बावरा’, ‘फायटर’, ‘द इंटर्न’, ‘गेहराईं’ या चित्रपटातही दिपीका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात देखील अभिनेता शाहरुख खानसोबत झळकणार आहे.