गेल्या काही दिवसांपासून कतारमध्ये फुटबॉल विश्व करंडकाचे सामने सुरू आहेत. जगभरातील फुटबॉल चाहते या सामन्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी वर्ल्ड कपच्या निमित्ताने स्थानिक स्तरावरही फुटबॉलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सामना जिंकणे ही कोणत्याही टीमसाठी अतिशय आनंदाची बाब असते. हे यश साजरं करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अमेरिकेमध्ये अशाच एका फुटबॉल सामन्यादरम्यान नुकतीच एक मजेशीर गोष्ट घडली आहे. आपली टीम सामना जिंकल्यानंतर या टीमच्या कोचने अनोख्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (After Team Victory of Football Match Coach Proposes to His Girlfriend on Ground).
हा व्हिडिओ अमेरिकेतला असून बेंजामिन रसेल फुटबॉल टीमने आपल्यासोबत खेळणाऱ्या व्हॅली हायस्कूल क्लबच्या टीमला हरवले. टीमचा विजय झाल्याने तो साजरा करत असतानाच मैदानावर या टीमचे कोच जॅकब विल्स आणि त्यांची गर्लफ्रेंड एमिली आले. जसे हे दोघे मैदानात आले तसे हा कोच गर्लफ्रेंडला अंगठी घालून प्रपोज करण्यासाठी चक्क गुडघ्यावर बसला. हे पाहून टीममधील खेळाडू आणखीनच खूश झाले आणि ते मैदानात चक्क उड्या मारुन टाळ्या वाजवत आपला आनंद व्यक्त करताना व्हिडिओमध्ये दिसले. हे सगळे पाहून एमिली हिला काहीसे लाजल्यासारखे झाले. मात्र तिनेही या प्रपोजलचा स्वीकार केला.
This high school football team broke out into cheers when one of their coaches proposed to his girlfriend on the field following a recent game 🎉 pic.twitter.com/5yXyeRg6YR
— NowThis (@nowthisnews) November 29, 2022
ट्विटरवर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून काही तासांत २९ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी तो लाईक केला असून बऱ्याच जणांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. नाचता नाचता आनंदाने हे सगळे खेळाडू आपल्या कोचच्या बाजुने जमा होतात. नंतर कोच उठतो आणि आपल्या प्रपोज केलेल्या गर्लफ्रेंडला जवळ घेऊन तिला किस करतानाही दिसत आहे. एकीकडे आपली टीम जिंकल्याचा आनंद आणि दुसरीकडे गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा त्यामुळे कोचसाठी तो दिवस डबल धमाका असलेला म्हणावा लागेल.