काही जणांचे शरीर इतके लवचिक असते की ते कसेही वळते आणि त्यामुळे ते व्यायामाच्या किंवा डान्सच्या काही अवघड स्टेपही अतिशय सहज करु शकतात. त्यांच्या याच लवचिकपणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुकही होताना दिसते. लहान मुलांमध्ये मोठ्या व्यक्तींपेक्षा लवचिकता अधिक असते असे म्हणतात. त्यांच्या हाडांना म्हणावा तितका कडकपणा न आल्याने त्यांचे शरीर सहज वळते. त्यामुळे एखाद्या अवघड जागेतून काही वस्तू हवी असेल किंवा आणखी काही तर ते काम लहान मुलांना सांगितले जाते. सध्या सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी एका क्लिकवर समजणे अगदीच सोपे झाले आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एक लहानगी मुलगी अतिशय अवघड अशा स्टेप्स अगदी लिलया करत असल्याचे दिसते.
या लहान मुलीचे शरीर इतके जास्त लवचिक आहे की ती करत असलेल्या एक एक करामती पाहून आपल्याला थक्क व्हायला होते. हा व्हिडिओ एखाद्या ट्रेनिंग सेंटरमधील असल्यासारखे वाटत आहे. कारण आजुबाजूला इतर मुले बसलेली असून ही मुलगी मध्यभागी आपल्या करामती करत आहे. ५ ते ६ वर्षाच्या या मुलीचे शरीर म्हणजे रबर बॉडी असल्याचे अनेकांनी तिच्या करामती पाहून म्हटले आहे. ती एकाएकी आपली पाऊले डोक्याला लावते तर कधी एकदम संपूर्ण शरीर अगदी सहजगत्या रोल करते. छातीवर सगळा बॅलन्स घेऊन ही मुलगी आपले पाय संपूर्ण गोल फिरवते तेव्हा तर पाहणारेही चकीत होतात. १ मिनीटाच्या या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी अतिशय शिस्तबद्धपणे आणि तितक्याच नेमकेपणाने सगळ्या हालचाली करताना दिसते त्यामुळे तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
Long-term goals start at a young age…pic.twitter.com/eDhBbA37ph
— Tansu YEĞEN (@TansuYegen) June 23, 2022
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या या व्हिडिओला कॅप्शन देताना, ‘भविष्यातली ध्येय साध्य करण्यासाठी लहान वयापासूनच सुरुवात करायला हवी.’ असे म्हटले आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे की आतापर्यंत तो जवळपास ९ लाख लोकांनी पाहिला आहे. २५ हजारांहून अधिक जणांनी तो लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या मुलीचे कौतुक केले आहे. ही मुलगी नेमकी कोणत्या देशातील कोणत्या शाळेतील आहे तसेच हा व्हिडिओ कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दल मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र मुलांकडे अशाप्रकारचे स्कील असणे ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.