प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह यांनी बॉलिवूडमध्ये महिला व पुरुष त्यांच्यात होणाऱ्या भेदभावांबाबत खुलेपणाने एक बाब सर्वांसमोर मांडली आहे. त्या म्हणतात, हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही जितका काळ तरुण आणि सुंदर दिसता तेव्हाच मुख्य भूमिकेसाठी तुमचा विचार केला जातो. एकदा तुमचे लग्न झाले आणि तुम्हाला मुलं झाली की तुम्ही आऊटडेटेड होता. अभिनेत्रींच्या बाबतीत ही गोष्ट प्रकर्षाने समोर येताना दिसते. त्यामुळे तुमचे लग्न झाले की तुम्हाला आई, काकू अशा भूमिका स्वीकाराव्या लागतात. मात्र अभिनेत्यांच्या बाबतीत असे होत नाही, वयाच्या पन्नाशीतही ते अभिनेत्याची भूमिका करु शकतात.
एकदा लग्न होऊन तुम्हाला मुलं झाली की तुमचे काय करायचे असा प्रश्न चित्रपटनिर्मात्यांना पडतो. मागील २५ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असताना आपल्या वाट्याला अनेकदा वयस्कर महिलांची भूमिका आल्याची खंतही त्या यावेळी बोलून दाखवतात. ‘वक्त’ चित्रपटात वयाच्या २८ व्या वर्षी मी अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली. त्यावेळी अक्षय कुमार माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. तर ‘हसरते’ सिनेमातही आपण २० वर्षाची असताना ३० ते ३५ वर्षाच्या महिलेची भूमिका केल्याचे त्या सांगतात.
मी १६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे मात्र आता मी फारशी मागे वळून पाहत नाही, जे झाले ते झाले असे म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे शेफाली सांगतात. त्या म्हणतात, अशाप्रकारे अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये भेदभाव होणार असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे मधली २ वर्षे हातात कोणतेही काम नसताना आपण आलेली कामे नाकारली आणि घरी राहणे पसंत केले. नुकतेच त्यांनी जलसा नावाचे एक हॉटेल सुरु केले. यानिमित्ताने त्यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी संवाद साधला. आपल्याला लोकांना खायला घालायला, ते सजवायला आणि सर्व्हींग करायला आवडत असल्याने आपण या नवीन क्षेत्रात पाऊल ठेवत असल्याचे त्या म्हणाल्या. मागील बरेच वर्षांपासून हॉटेल सुरु करायचे आपले स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाल्याने आपल्याला आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शेफाली लवकरच ‘डॉक्टर जी’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहेत, तसेच आलिया भट्ट आणि निजय वर्मा यांच्यासोबत ‘डार्लिंग्ज’मधूनही त्या आपल्यासमोर येतील. तर दिल्ली क्राइम या प्रसिद्ध वेबसिरीजच्या सेकंड सिझनमध्येही त्यांची भूमिका आहे.