मिसळ असं नुसतं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटावं असा हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. थंडीच्या दिवसात तर बाहेर धुकं, गारठलेले आपण आणि समोर वाफाळती मिसळ...आणखी काय हवं आयुष्यात...कोसाकोसावर चव बदलणारी ही मिसळ कशीही केली तरी भन्नाटच लागते. मग खान्देश, वऱ्हाडी, घाटावरची, कोकणी पद्धतीची, पुणेरी अशा एक ना अनेक मिसळीचे प्रकार राज्यात पाहायला मिळतात. मिसळप्रेमींनी या वेगवेगळ्या चवींच्या मिसळी चाखल्या नाहीत तरच नवल. अगदी एखाद्या टपरीपासून ते फाइव स्टार हॉटेलमध्ये मिसळ या पदार्थाला तोड नाही.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आणि केवळ महाराष्ट्रीयन नाही तर परदेशातील लोकांनाही वेड लावणारी ही मिसळ अनेकांना आपल्या प्रेमातपाडते. आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर अस्सल मराठमोळा असून त्याचेही मिसळप्रेम नुकतेच पाहायला मिळाले. त्याने इन्स्टाग्रामवर नुकतेच एक रील पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तो मिळस खात असताना दिसत आहे. अतिशय चवीने मिसळ पाव खाताना सचिन मिसळ या पदार्थाचे भरभरुन कौतुक करत आहे. तो म्हणतो, मिसळ पाव की कुछ बात ही अलग है, हा पदार्थ मला बर्मिस खाऊसुई (Burmese Khowsuey) या पदार्थाची आठवण करुन देतो. पण महाराष्ट्राची मिसळ एक नंबर असंही तो पुढे म्हणतो.
या पोस्टमध्ये तो रविवार असू नाहीतर सोमवार मी मिसळ पाव कधीही खाऊ शकतो असेही तो म्हणतो. सोशल मीडिया आणि त्यातही इन्स्टाग्रामवर सचिन नेहमीच अॅक्टिव्ह असतो. त्याचे जगभरातून लाखो फॉलोअर्स आहेत. याआधीही आपण अनेक सेलिब्रिटींचे किंवा खेळाडूंचे मिसळप्रेम पाहिले आहे. सचिन खवय्या असून त्याला निरनिराळ्या पदार्थांची चव चाखायला आवडते. सचिन स्वयंपाकघरातही काही प्रयोग करतानाचे फोटो आणि व्हिडियो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.
कशी करायची झटकेदार मिसळ पाहूया
साहित्य
मटकी - २ वाट्या मोड आलेली
कांदा - ४ ते ५ मध्यम आकाराचे
टोमॅटो - ३
आलं, मिसची लसूण पेस्ट
कांदा लसूण मसाला - १ चमचा
तिखट - अर्धा चमाचा
धने -जीरे पावडर - १ चमचा
तेल - ३ चमचे
हिंग, हळद - फोडणीसाठी
ओले खोबरे - अर्धी वाटी खोवलेले
मीठ - चवीप्रमाणे
बटाटे - ३
पोह्याचा चिवडा किंवा पोहे - ३ वाट्या
फरसाण - आवडीनुसार
कोथिंबिर - अर्धी वाटी बारीक चिरलेली
लिंबू
कृती -
१. सुरुवातीला मटकी उकडून ती परतून घ्या.
२. तर्री किंवा रस्सा हा मिसळमधील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तो चविष्ट होणे अतिशय आवश्यक असते. तेलात हिंग आणि हळद घालून आलं मिरची लसूण पेस्ट घालावी. त्यामध्ये ओले खोबरे, कांदा टोमॅटो पेस्ट घालून सगळे एकत्र परतून घ्यावे. त्यात तिखट, कांदा लसूण मसाला, धने जीरे पावडर, तिखट, मीठ चवीप्रमाणे घालावे. हे सगळे एकजीव होईपर्यंत तेलात चांगले परतावे. पाणी घालून तर्री चांगली उकळू द्यावी
३. बटाटे उकडून त्याची भाजी केली तरी चालते किंवा नुसते उकडलेले बटाटे साले काढून स्मॅश करुन मिसळीवर घेतले तरी चालतात.
४. पोह्याचा चिवडा असेल तर उत्तम तो नसेल तर कांदेपोहे करतो तसे पोहे करुन घ्यावे.
५. कांदा, कोथिंबिर बारीक चिरुन ठेवावे. लिंबाच्या फोडी कराव्यात
६. सगळे झाल्यावर मटकी, त्यावर बटाटा, पोहे किंवा चिवडा, कांदा, फरसाण आणि सगळ्यात शेवटी तर्री घ्यावी. त्यावर आवडत असल्यास खोबरे, कोथिंबिर आणि लिंबू पिळून घ्यावे.
७. थंडीच्या दिवसांत ब्रेड स्लाईस किंवा पावाबरोबर ही मिसळ अतिशय चांगली लागते.
टिप -
प्रत्येक ठिकाणी मिसळ करण्याची रेसिपी वेगळी असते. कोणी खोबऱ्याचा वापर करत नाहीत तर कोणी पोहे किंवा पोह्याचा चिवजा वापरत नाहीत. मटकीच्या जागी काही वेळा मिश्र कडधान्यांचा वापर केला जातो. तर बटाटा हाही आवडीप्रमाणे घेतला जातो.