एअर हॉस्टेस म्हटलं की विमानातील प्रवाशांशी अतिशय आदबीने बोलणाऱ्या आणि त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या सुंदर तरुणी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण सतत एकच प्रकारचे काम करुन त्यांनाही कंटाळा येत असेल. हाच कंटाळा घालवण्यासाठी या एअर हॉस्टेस काही ना काही करताना दिसतात. कधी रिकाम्या विमानात तर कधी एखाद्या एअरपोर्टवर डान्स करत त्या आपल्या कामाचा शीण घालवतात. एअर हॉस्टेस (Airhostess) हे त्यांचे प्रोफेशन असले तरी त्याही आपल्याप्रमाणेच वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या परफॉमन्सला नेटीझन्सचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असतो. स्पाइसजेटची (Spicejet) एअर हॉस्टेस असलेल्या उमा मीनाक्षी अशाप्रकारचे व्हिडिओ करण्यात सध्या आघाडीवर आहेत. त्यांचे व्हिडिओ (Viral Video) भरपूर व्हायरलही होताना दिसतात.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करुन त्याचे व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करण्याचा ट्रेंड (Social Media Trend) आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवर तरुण-तरुणी अशाप्रकारचे व्हिडिओ सतत पोस्ट करत असतात. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या एअर हॉस्टेसही मागे नाहीत. त्यांनी आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केल्यानंतर त्याला नेटीझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळतो. गेल्या काही दिवसांत अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले असून नेटीझन्सही त्यांच्या या डान्सचा आनंद घेताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उमा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कच्चा बदाम...’ गाण्यावर ठेका धरल्याचे यामध्ये दिसत आहे.
तिने ठुमके घेत केलेला हा डान्स नेटीझन्सना आवडला असून तिच्या हावभावांनी आपण घायाळ झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या व्हिडिओला गेल्या ५ दिवसांत ४४ हजारहून अधिक जणांनी लाईक केले असून जवळपास एक लाख जणांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे. तर नियमितपणे अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या या एअर हॉस्टेसला बऱ्याच जणांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. उमा मीनाक्षी यांनी याआधी ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं,....’ या गाण्यावर ठेका धरला होता, तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘गलतीसे गलती की...झक मारके...’ या गाण्यावर केलेला डान्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिची डान्स करतानाची एनर्जी आणि हावभाव पाहून आपल्यालाही तिच्यातील उत्साह भावल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रकारची सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन आणि परवानगी घेऊन हा व्हिडिओ विमानात शूट करण्यात आल्याचेही उमा मिनाक्षी यांनी आपल्या पोस्टच्या खाली स्पष्ट केले आहे.