Join us  

राहा वर्षाची झाली तरी आजवर मुलीचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही..आलिया भट सांगते खरं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 11:54 AM

Alia bhat opens up about not showing her daughter Raha’s face yet : असे करण्यामागे पालक म्हणून आपली नेमकी काय भूमिका आहे याबाबत आलिया म्हणते...

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध जोडपे. आलियाच्या प्रत्येक गोष्टीबाबत सोशल मीडियावर सतत काही ना काही चर्चा रंगलेल्या असतात. ती कॅरी करत असलेली फॅशन, तिचे सौंदर्य, तिचे लग्न, त्यानंतरची प्रेग्नन्सी या सगळ्याच गोष्टींबाबत काही ना काही चर्चा होताना दिसतात. त्या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि काही महिन्यातच आलियाने एका गोड परीला जन्म दिला. तिच्या गर्भधारणेवरुनही बऱ्याच चर्चा रंगताना दिसल्या. ती प्रेग्नंट असल्याचे आणि मुलगी झाल्याचे किंवा तिचे नाव जाहीर करण्यासाठी या कपलने सोशल मीडियाचा आधार घेतला होता (Alia bhat opens up about not showing her daughter Raha’s face yet). 

अभिनेते किंवा अभिनेत्री ज्याप्रमाणे चर्चेत असतात तसेच स्टार किडसवरही मीडियाची बारीक नजर असते. त्यांचा चेहरा दिसावा यासाठी त्यांच्यावर सतत कॅमेरे असतात. पण आलियाने मात्र मुलगी १ वर्षाची झाली तरीही आपल्या मुलीचा चेहरा अद्याप मीडियासमोर आणला नाही. मात्र तिने मीडियाला केलेले आवाहन त्यांनीही पाळले आणि राहाचा चेहरा अद्याप आपल्यासमोर आलेला नाही. यावरुनही तिच्याबाबत बरीच उलट-सुलट चर्चा झाली. पण असे करण्यामागे पालक म्हणून आपली नेमकी काय भूमिका आहे याबाबत आलियाने नुकतेच 'हिंदुस्तान टाइम्स'च्या एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामध्ये ती राहाचा चेहरा न दाखवण्याबाबत काय म्हणते पाहूया...

आलिया म्हणते... 

अनेक जण मी मुलीचा चेहरा लपवते म्हणून माझ्यावर टिका करतात. पण प्रत्येकाला आपल्या मुलांचा अभिमान असतो त्याचप्रमाणे माझी मुलगीही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण आता ती या जगात येऊन फक्त एकच वर्ष झालं आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा फोटो टाकला तर तो काही क्षणात मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल. पालक म्हणून आम्हीही आता नवीन आहोत, आम्हीही बऱ्याच गोष्टी शिकतोय त्यामुळे आम्हालाही या सगळ्यासाठी नक्कीच वेळ हवा आहे. 

मुलीचा चेहरा न दाखवण्यामागे लपवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे आमची जेव्हा तयारी होईल आणि आम्हाला वाटेल की आता तिने जगजाहीर व्हावे, तेव्हा आम्ही नक्कीच तिचा चेहरा जगाला दाखवू. पण आता ती इतकी लहान आहे की पापाराझींच्या चक्रात तिने यावं असं आम्हाला वाटत नाही. हा क्षण येत्या काळात कधीही येईल असेही आलिया यावेळी बोलताना म्हणाली. असे असले तरी राहाचा चेहरा आपल्याला कधी दिसणार याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्हच आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलआलिया भटरणबीर कपूरपालकत्व