प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील एक महत्त्वाचा लग्नसोहळा आणि या दोघांनी घेतलेल्या जन्मभराच्या सोबतीच्या आणाभाका यामुळे चाहते खूश होते. नव्यानेच झालेले लग्न, संसार, करिअर हे सगळे थोडे कुठे सेट होते न होते तोच या दोघांनी आपल्याला मूल होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. लग्नाला अवघे दोन महिनेच झाले असताना त्यांनी मूल होण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. इतक्या लवकर मूल होण्याचा निर्णय कसा घेतला इथपासून ते आलिया लग्नाच्या आधीच प्रेग्नंट नव्हती ना, आता आलियाच्या करीयरला पूर्णविराम लागणार का अशा अनेक गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या. मात्र लग्न, मूल, कुटुंब करिअर हा प्रत्येक स्त्रीचा आणि तिच्या कुटुंबियांचा वैयक्तिक प्रश्न असून त्याबाबत अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने चर्चा करणे चूक आहे. अभिनेत्रींनाही आपले आयुष्य असू शकते आणि त्याबाबातचे निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे (Alia Bhatt Opens up About Being Trolled for Getting Pregnant Soon After Marriage).
आलिया सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. इतकेच नाही तर ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून आलिया हॉलिवूड मध्येही पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटींग पूर्ण करुन आलिया भारतात परतली. प्रेग्नन्सीतही आलियाचे सौंदर्य, ती कॅरी करत असलेली फॅशन यांबाबत सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. आलियाही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती आपले वेगवेगळ्या आऊटफीटमधले फोटो सातत्याने सोशल मीडियावर अपलोड करत असते. ‘इंडिया टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने आपल्यावर प्रेग्नन्सीबाबत होणाऱ्या टिकांबद्दल मौन सोडले.
आलिया म्हणाली, महिलेने कोणतीही गोष्ट केली तरी लगेच त्याची हेडलाइन होते. ती आई होणार असो, ती नवीन कोणाला डेट करत असो, ती क्रिकेट मॅच बघायला जावो किंवा सुट्टीत कुठे बाहेर जावो. काही ना काही कारणाने सगळ्यांचे डोळे कायम तिच्याकडेच असतात. कमी वयात प्रेग्नन्सीबाबतचा निर्णय घेण्याबद्दल आलियाला प्रश्न विचारला असता ती म्हणाली, काही गोष्टी तुम्ही प्लॅन करत नाही, तर त्या घडतात. आपल्या आयुष्यात होणाऱ्या नवीन बदलांबाबत मी खूश आहे आणि लोकांनी त्याकडे इतकं लक्ष द्यायची आवश्यकता नाही असंही आलिया म्हणाली. विविध माध्यमांतून तिला सतत सूचना दिल्या जात असल्यामुळे ती काहीशी वैागून म्हणाली, सध्या अनेकांकडे ड़ॉक्टरांचे सर्टीफिकेट आहे असं वाटायला लागलंय. मला सतत आराम करण्याबाबत, काळीज घेण्याबाबत सांगण्यात येत आहे, तुम्हाला माझी काळजी वाटत असली तरी आता आपण या जुनाट विचारांतून बाहेर यायला हवं कारण आता आपण २०२२ मध्ये जगत आहोत.