America's Got Talent हे एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ... अनेक कलाकार तिथे त्यांची कला सादर करायला येतात. नाविण्यपूर्ण, वेगळं करावं लागणार... तसंच एक आगळ्या- वेगळ्या शैलीतलं नृत्य घेऊन जम्मूची अर्शिया त्या व्यासपीठावर उतरली आणि तिचा तो थरारक डान्स पाहून प्रेक्षकांसह परीक्षकही तिच्याकडे आ वासून पाहू लागले. डान्स आणि जिमनॅस्टिक असं एकत्रित करून तिने जे काही सादरीकरण केलं ते पाहून तिच्या शरीरात हाडं आहेत की नाही, असाच प्रश्न पडतो.
अर्शिया ही मुळची जम्मूची. नृत्याची तिला विशेष आवड. त्यामुळेच तिने या स्पर्धेत उतरण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पुर्णही केलं. यापुर्वी तिच्या नृत्याची झलक अनेकांनी डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर आणि सुपर डान्सर 4 या कार्यक्रमात पाहिली आहेच.
पण अमेरिकाज गॉट टॅलेन्टच्या व्यासपीठावर तिने जे काही सादरीकरण केलं ते खरोखरच अतिशय वेगळं होतं. तिथले परीक्षक सिमोन कोवेल, हेल्डी क्लम, हॉवी मंडेल, सोफिया वेर्गरा यांना तिने पहिल्यांदाच सांगितलं होतं की तिला डान्स करायला आवडतो. पण सगळ्यांसारखा नाही. म्हणूनच ती नेमकं काय सादर करणार याकडे परीक्षकांचंही लक्ष होतंच.
नृत्य सादर करण्यासाठी ती भुताची वेशभुषा करून आली होती. त्यानंतर तिचे चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिच्या हालचाली उपस्थितांची उत्सूकता प्रत्येकवेळी वाढविणाऱ्या ठरल्या. जिमनॅस्टिक करत तिने असं काही नृत्य केलं की ते पाहूनच तिच्या शरीराच्या लवचिकतेचं अनेकांना कौतूक वाटलं.
कांदाभजी, सामोसा, वडापाव खाल्ल्यानंतर चहा पिणं तुम्हालाही आवडतं? बघा तब्येतीसाठी ते चांगलं की वाईट
ती ज्या काही कठीण हालचाली अगदी सहजतेने करत होती ते पाहून तर तिच्या शरीरात हाडं आहेत की नाही, असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडला. आता पुढे ही काय करणार, अशी उत्सूकता प्रत्येकवेळी प्रेक्षकांना वाटत होती. प्रेक्षकांसह परीक्षकही तिच्या त्या नृत्याने भारावले होते. म्हणूनच तर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव तर झालाच पण तिच्या कलेला परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.