भारतीय नवरी म्हणजे भरजरी शालू किंवा घागरा घातलेली हे आपल्यासाठी अगदीच सामान्य आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे लग्नात शालू नेसला जातो त्याचप्रमाणे परदेशात नवरीने गाऊन घालण्याची पद्धत आहे. मोठा घेरदार गाऊन आणि छानसा क्राऊन घातला की नवरी लग्नासाठी तयार होते. पण भारतीय नवरी मात्र भरजरी कपड्यांमध्ये आणि साजशृंगारातच खुलून दिसते. देश तसा वेश असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे या पद्धतींमध्येही फरक पाहायला मिळतो. अनेकदा फॅशन म्हणून आपण परदेशातील लोकांप्रमाणे पेहराव करतो. पण आपल्याला जसे त्यांच्या गोष्टींचे आकर्षण असते तसेच त्यांनाही आपल्या गोष्टींचे असते. अशाच एका परदेशी नवरीने भारतीय साजशृंगार केल्यावर त्यामध्ये ती किती सुंदर दिसते हे एका व्हिडिओतून नुकतेच समोर आले. इतकेच नाही तर तिला पाहून तिच्या घरच्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती (American Bride wore Lehenga For the First Time Reaction of her Family Viral Video).
व्हिडिओमध्ये अमेरिकन तरुणी भारतीय पद्धतीचा लेहंगा घालून तयार होते. लाल रंगाच्या भरजरी लेहंग्यात ती खोलीच्या बाहेर येते, त्यावेळी तिचे नातेवाईक तिची वाट पाहत उभे असतात. ती जशी तयार होऊन बाहेर येते तसे हे सगळे एकदम आनंदीत होतात. तयार होऊन आलेल्या या नवरीला मिठी मारण्यासाठी सगळे एकत्र येतात आणि तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक करतात. तिला अशा वेशात पहिल्यांदाच पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लपत नाहीत. मेकअप आणि हेअर आर्टीस्ट असलेल्या प्रियांका लुजाडो नावाच्या अकाऊंवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ‘हा क्षण किती सुंदर आहे, हन्ना रॉजर्स तू आणि तुझी फॅमिली खूपच छान आहात.’
जेव्हा तुमची अमेरिकन फॅमिली तुम्हाला भारतीय नवरीच्या रुपात पाहते...अशी कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आली आहे. लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून अवघ्या १० दिवसांत ५ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. यावर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून भारतीय संस्कृती आणि आंतरदेशीय विवाहांबद्दलही काहींनी मत व्यक्त केले आहे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांनीही भारतीय वेश परिधान केला असून हे सगळे यामध्ये अतिशय सुंदर दिसत असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते.