' माझा नवरा मला समजून घेत नाही', ही तक्रार पृथ्वीवरल्या सर्व बायकांची असावी एवढी सर्वसामान्य आहे. काहीजणी तर केवळ अशी तक्रार दुसऱ्याकडे केली की जरा मन मोकळं झाल्यासारखं वाटतं म्हणून तक्रार करतात. तर काहींना अशा तक्रारीची सवयच झालेली असते. तर काहींच्या त्यांच्या नवऱ्याबाबत असलेल्या तक्रारींकडे खुद्द नवरा देखील ' हे माझ्यासाठी रोजचंच ' म्हणत दुर्लक्ष करतो. पण न्यूझिलंडमधील एका महिलेनं आपल्या नवऱ्याबाबत केलेली तक्रार खुद्द नवऱ्यानं आणि इतर सगळ्यांनीच हसण्यावारी घेतली.
Image: Google
न्यूझिलंडमधील लिंडा मॅकॅलिस्टर या महिलेला आपल्या नवऱ्याच्या एका सवयीचा एवढा वैताग आला, की त्या वैतागापोटी लिंडानं आपला नवरा विकण्याची जाहिरातच ऑनलाइन सेलिंग साइटवर टाकली. लिंडाचा नवरा जाॅनला फिरण्याची भारी हौस. पण याला आपल्या बायको मुलांबरोबर नाही तर मित्रांसोबत फिरायला आवडतं. फिरायला जाताना आपल्या बायकोची परवानगी घेणं तर सोडाच पण साधं तिला सांगूनही जात नाही. उलट कामाला जातो असं खोटंच सांगून तो सरळ फिरायला निघून जातो.
लिंडा म्हणते, 'मला माझ्या नवऱ्याच्या या सवयीचा वैताग आला आहे. तो मला मदत करु शकतो, पण घर सांभाळतांना, मुलांकडे लक्ष देतांना तो माझी काहीच मदत करत नाही. एकटा फिरतो आणि मी मग मुलांचं मन रमवण्यासाठी नाना तऱ्हा कराव्या लागतात. असा नवरा असून तरी काय उपयोग, तो विकलेलाच बरा ' असं म्हणत लिंडानं 'ट्रेड मी' या साइटवर ' नवरा विकणे आहे!' अशी जाहिरातच देऊन टाकली. जाहिरात देताना आपल्या नवऱ्याचं वय, उंची, त्याचा व्यवसाय, वागणं याबाबत तिने सविस्तर माहिती दिली असून तो चांगल्या कंडिशनमधे आहे असं देखील लिहिलं आहे. 'माझा नवरा पैशानं विकला जात नसेल तर तो मी ज्याला हवा त्याला फुकट द्यायलाही तयार आहे !' असं लिंडानं जाहिरातीत शेवटी म्हटलं आहे.
Image: Google
लिंडाची ही जाहिरात साइटवर जाताच अनेकांनी त्यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. लिंडाच्या नवऱ्याला त्याच्या मित्रांकडून 'तुझ्या बायकोनं बघ कशी जाहिरात दिली' हे कळवलं. ती वाचून जाॅनलाही हसू आवरलं नाही. त्याने माहिती देणाऱ्या आपल्या मित्रांनाच ' बघा जरा, काळजी घ्या' म्हणत बायकोच्या तक्रारीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. लिंडानं भलेही ही जाहिरात वैतागून दिली असली तरी या जाहिरातीतून तिची विनोदबुध्दीच दिसली. तिच्या नवऱ्यानं देखील आपल्या बायकोच्या या कृतीबद्दल तिच्यावर न चिडता तिच्या या कृतीला प्रतिक्रिया देताना आपल्यातील विनोद बुध्दीचं दर्शन घडवलं. स्वत: ट्रेड मी या लिंकच्या मॅनेजरनेही ही बाब गांभिर्यानं घेतली नाही. आपल्या साइटवर नवरा विकण्याची अशी जाहिरात पहिल्यांदाच आली आहे. न्यूझिलंडमधील सर्वांकडेच विनोदबुध्दी आहे, असं सांगत ग्राहकांचं समाधान व्हावं हाच आपल्या साइटचा उद्देश आहे. असं सांगणाऱ्या मॅनेजरनं लिंडाला ही अशी जाहिरात तुम्ही का दिली म्हणून रागानं प्रतिक्रिया दिली नाही. त्याने दोन तास ही जाहिरात आपल्या साइटवर ठेवली आणि मग काढून टाकली. तोपर्यंत लिंडाच्या नवऱ्यावर 100 डाॅलरची बोली लागलेली होती.
Image: Google
आता जाॅन घरी आल्यानंतर लिंडा कशी वागेल, याचं आपण टेन्शन घेण्याची गरज नाही. दोघेही विनोदबुध्दीचे असल्यानं दोघेही एकमेकांना समजून घेतील असं सगळ्यांना वाटतंय. पण नवऱ्यावर चिडलेल्या बायकोला नेहमीच हसण्यावारी घेऊ नये. तिच्या तक्रारीतली वेदना समजून घेत , तसं वागण्याचा प्रयत्न नवऱ्यानं केला तरी बायकोला छान वाटतं. लिंडाच्या तक्रारीतलं मर्म जाॅननं समजून घ्यावं एवढीच इच्छा!