८ मे रोजी जगभर थाटामाटात मदर्स डे साजरा झाला. केक कापून सेलिब्रेशन, आईसाठी छानसं गिफ्ट, सोशल मिडियावर आईचे आणि स्वत:चे फोटो शेअर करणं.. असं वेगवेगळ्या माध्यमातून जगभरात मातृदिनाचं (mothers day 2022) मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन झालं.. मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळं सेलिब्रेशन केलं ते प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी. मातृदिनाचं औचित्य साधून त्यांनी इडली अम्माला (idli amma) तिच्या हक्काचं घरकुल दिलं आणि खऱ्या अर्थाने तिचा, तिच्या मातृत्वाचा गौरव केला.
त्यामुळेच तर सध्या सोशल मिडियावर आनंद महिंद्रा यांचं भरभरून कौतूक होत आहे आणि या इडली अम्मा नेमक्या आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. इडली अम्माचं मुळ नाव कमलाथल असून त्या तामिळनाडू येथील वडिवेलम्पलयम या ठिकाणच्या रहिवासी. 'कमलाथल' ते 'इडली अम्मा' (idli amma) असा त्यांचा प्रवासच त्यांच्या मातृहृदयाची साक्ष देणारा आहे.
सध्या महागाई एवढी वाढली आहे की १ रुपयांत चॉकलेट, गोळ्या या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही, हे आपण जाणतो. म्हणूनच तर १ रुपयांत इडली खाऊ घालणारी ही इडली अम्मा सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते. एक- दोन नाही तर तब्बल ३७ वर्षांपासून इडली अम्मा हा उपक्रम राबवते आहे. वडिवेलम्पलयम येथेच तिचं एक झोपडीवजा हॉटेल आहे. तेच तिचं घर आणि तेच तिचं हॉटेल. त्या भागातल्या गरिबांसाठी ती जणू काही अन्नपुर्णाच आहे. कारण त्या प्रांतातील सगळेच गोरगरीब, मजूर, गरजवंत प्रवासी अशा सगळ्यांनाच ती १ रुपयांत इडली खाऊ घालते. कमी पैसा असेल तरी तिच्याकडे जाऊन आपलं पोट भरेल, हा विश्वास तिथल्या हजारो लोकांच्या मनात तिने निर्माण केला आहे.
त्यामुळेच तर तिच्या या कार्याचा गौरव प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मातृदिनी केला. त्यांनी इडली अम्माला तिच्या हक्काचे घरकुल भेट म्हणून दिले आणि तिच्या मातृत्वाचा, तिच्या समाजकार्याचा जगजाहीर सन्मान केला. पैसा असेल तरच समाजकार्य करता येते, लोकांसाठी झटता येते, हा अनेकांचा समज असतो. पण तो किती पोकळ आहे, हे इडली अम्माचं कार्य पाहून लक्षात येतं. याविषयी आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात ते म्हणतात की एखाद्याचं निस्वार्थ मनाने पोषण करणं, देखभाल करणं हे आईचे सगळे गुण इडली अम्मामध्ये आहेत. आम्हाला तिची मदत करण्याचे सौभाग्य मिळाले, ही आनंदाची गोष्ट असून त्यांनी इडली अम्माच्या घराचे काम वेळेत पुर्ण केल्याबद्दल त्यांच्या टीमचेही मनापासून कौतूक केले.