निसर्ग नियमानुसार माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये एक नाते निर्माण झाले आहे. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे लळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते.घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी हे जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा ते आपल्या जवळच्या माणसासारखेच भासतात. अशाच एका मंदिरातील हत्तीचे प्रेम दाखविणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन, उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. नववर्षाच्या शुभ दिनीसुद्धा त्यांनी एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे(Anand Mahindra shares video of Elephant blessing a dancer in Karnataka's temple).
नक्की काय आहे या व्हिडिओत ?
हा व्हिडीओ एका नर्तिकेचा आणि तिला आशीर्वाद देणाऱ्या गजराजाचा आहे. कर्नाटक मधील कटील येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात एक नर्तिका पारंपरिक पोशाख परिधान करून नृत्य करत आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या एका हत्तीसमोर ही नर्तिका 'गणनायकाय... गणदैवताय... गणाध्यक्षाय धिमही' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. ही मुलगी नाचता - नाचता हत्तीकडे आशीर्वाद घेण्यासाठी वळते तेव्हा हा हत्तीसुद्धा तिला मोठ्या प्रेमाने सोंडेने आशीर्वाद देतो. हा गजराज नंतर परत एकदा त्याच कृतीची पुनरावृत्ती करताना मान हलविताना दिसतो. अशाप्रकारे हा गजराज आपली सोंड त्या मुलीच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद देतो.
आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया...
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, "छान !! मला वाटते की हा गजराज आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे !"
Sri Durgaaparameshwari temple , Kateel, Karnataka.
— anand mahindra (@anandmahindra) December 31, 2022
Amazing. And I would like to think the Temple Elephant is bestowing a blessing on all of us for a Happier New Year! 😊 pic.twitter.com/s2xdqV8w5D
नेटिझन्स काय म्हणत आहे?
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ ८०० हून अधिक नेटिझन्सनी रिट्विट केला आहे तर २८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हडिओला पसंती दर्शविली आहे. "मंदिरातील हत्ती हे प्रेमळ प्राणी असतात... प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या सोंडेने हळूवारपणे आशीर्वाद देतात." अशी कमेंट एका युजरने केली आहे. आमच्या केरळमध्ये असे मानले जाते की, हत्तीची सोंड जितकी लांब आणि मोठी तितकी ती बघायला छान आणि नेत्रदीपक वाटते. या हत्तीची सोंड देखील तशीच आहे, त्याला पाहणे म्हणजे भाग्याचे आहे.... अशी सुंदर कमेंट एका नेटिझनने केली आहे.