चार महिन्याचे बाळ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पाळण्यात किंवा दुपट्यावर झोपून हातपाय मारणारे बाळ येते. या वयात बाळं साधारणपणे आपण हाक मारली तर प्रतिक्रिया देतात आणि पालथे पडायला शिकतात. पण एका बाळाने खूपच कमाल केली आहे, आंध्र प्रदेश येथील अवघ्या ४ महिन्याच्या एका मुलीने आपल्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. आता तिने असे काय केले की ज्यामुळे जागतिक विक्रमावर तिची नोंद झाली, तर या चिमुकलीने १०० पेक्षा अधिक फ्लॅशकार्ड ओळखून दाखवले आहेत.तिच्या हुशारीची दखल घेत नोबल वर्ल्ड रिकॉर्डने त्याचा सन्मान केला आहे. (Andhra Pradesh four month old baby girl Kaivalya is world record holder baby to identify 100 flashcards)
या बाळाची हुशारी पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तर बाळाला १२० फ्लॅशकार्ड दाखवण्यात आले होते. यात १२ फुलं, २७ फळं, २७ भाज्या, २७ प्राणी आणि २७ पक्षांचा समावेश होता. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी हा विक्रम करण्यात आला असून या बाळाचे नाव कैवल्या आहे. आपल्या बाळाला अशाप्रकारे ओळखता येतं हे कैवल्याच्या आईच्या लक्षात आले आणि त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी चित्र ओळखण्याचा व्हिडिओ तयार करुन तो नोबल वर्ल्ड रेकॉर्डला पाठवला.नोबल वर्ल्ड रेकॉर्डने हा व्हिडिओ पाहिला आणि तिच्या हुशारीबाबत खात्री केली. त्यानंतर कैवल्याला टीमकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
तिची ही हुशारी जन्मत: असल्याचे किंवा गर्भसंस्कारांमुळे त्यामध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे. पण अशाप्रकारे ४ महिन्याच्या मुलीने इतक्या गोष्टी ओळखणे ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्या इतक्या लहान मुलीने अशाप्रकारे जागतिक विक्रम केल्याने तिच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.कैवल्या आणि तिच्या आई-वडिलांनी पुरस्कार हातात घेऊन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ही चिमुकली फ्लॅशकार्ड ओळखत असल्याचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला आहे.