ट्रेनमध्ये चढताना, उतरताना, ट्रेनचा ट्रॅक क्रॉस करताना बरेच अपघात घडतात. निष्काळजीपणा किंवा कधी अनावधानाने हे अपघात घडतात. अशाप्रकारच्या अपघातांमध्ये काही वेळा व्यक्तींचे जीव जातात. तर काही वेळा आजुबाजूच्या लोकांच्या प्रसंगावधानतेमुळे जीव थोडक्यात वाचतो. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतात आणि हळहळही व्यक्त केली जाते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा मात्र प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एक तरुणी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी अडकल्याचे दिसते. ही घटना विशाखापट्टणम याठिकाणी घडली असून पुढे काय झाले हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे (Andhra Student Stuck Between Train and Platform Rescued By RPF and Railway Police).
विशाखापट्टणममधील दुव्वाडा रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरणारी विद्यार्थी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली होती. अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून विद्यार्थिनीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. शशिकला असं या मुलीचं नाव असून ती 20 वर्षांची आहे. ती एमसीए या शाखेची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती कॉलेजला जाण्यासाठी अण्णावरमहून दुव्वाडा येथे पोहोचली होती. गुंटूर-रायगडा एक्स्प्रेसमधून उतरताना पाय घसरल्यामुळे शशिकला रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्या मधल्या भागात अडकली. सुरुवातीला तिने स्वत: बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात अपयश आल्याने तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी तत्काळ रेल्वे चालकाला गाडी थांबवून ठेवण्यास सांगितलं. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी तातडीने तिला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मचा काही भाग कटरनं कापला.
साधारण दीड तासांच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थिनीची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी शशिकलाला रुग्णालयात हलवण्यात आलंया घटनेमुळे गुंटूर-रायगडा एक्स्प्रेसला दीड तास उशीर झाला. शिवाय, या मार्गावरच्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला. ट्विटरवर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रसंगावधानता दाखवल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. मात्र अशाप्रकारचे अपघात घडू नयेत म्हणून ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील अंतर कमी करायला हवे. तसेच प्रवाशांनीही योग्य ती काळजी घ्यायला हवी.