घनदाट केस कोणाला नाही आवडत. परंतु, ते केस जर शरीरावर उगवले असतील तर काहींना आवडतं, काहींना नाही. मात्र, हेच केस जर चेहऱ्यावर उगवले तर...! शॉक बसला ना, हो एका १७ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर चक्क घनदाट केस उगवले आहेत. एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे फक्त डोळे सोडले तर संपूर्ण चेहऱ्यावर केस उगवले आहेत. त्या मुलाला पाहून कोणीही घाबरेल. मध्य प्रदेशातील नंदलेटा या छोट्याशा गावात ललित पाटीदार नावाचा मुलगा राहतो. ज्याच्या चेहऱ्यावर घनदाट केस उगवले आहेत. तो हाइपरट्रिकोसिस या वेयरवॉल्फ सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त असून, चेहऱ्यासह शरीरातील अन्य भागांवर केस उगवले आहेत.
"छोट्यांसह थोरामोठ्यांपर्यंत सगळेच घाबरतात"
ललितने मुलाखतीदरम्यान सांगितले, "मी 17 वर्षांचा आहे आणि शाळेतही जातो. सुरुवातीला मला पाहून लहान मुले आणि लोकं घाबरायचे. मुलांना वाटायचे की, मी त्यांचा एखाद्या प्राण्याप्रमाणे चावा घेईन. जेव्हा मी जन्मलो तेव्हा माझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर खूप केस होते, असं मला माझ्या आई वडिलांनी सांगितले. जेव्हा मी जन्मलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या अंगावरील केस शेविंग करून काढले होते. जेव्हा मी सहा वर्षांचा झालो, तेव्हा माझ्या केसांकडे जास्त कोणी लक्ष देत न्हवते. मात्र, मला कळून येत होतं की माझ्या अंगावर केस इतरांपेक्षा अधिक वेगाने वाढत जात आहे. माझे वाढते केस पाहून मला सगळे माकड म्हणून हिणवायचे."
ललित पुढे म्हणाला, "मी लहान असताना लोक माझ्यावर दगडफेक करायचे, कारण मी सामान्य माणसांसारखा दिसत नव्हतो. मी दिसायला खूप वेगळा होतो, कारण माझ्या संपूर्ण शरीरावर केस होते. मलाही सामान्य माणसांसारखे जगायचे आहे. आणि आनंदी राहायचे आहे."
हाइपरट्रिकोसिस वेयरवोल्फ सिंड्रोम म्हणजे काय ?
शरीरावर केसांच्या वाढीच्या असामान्य स्थितीला हायपरट्रिकोसिस म्हणतात. या आजाराला हायपरट्रिकोसिसला वेअरवॉल्फ सिंड्रोम असेही म्हणतात. या स्थितीत माणसाच्या शरीरावर इतरांपेक्षा जास्त केस येतात. हे सिंड्रोम पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही उद्भवू शकते. हे आजार अत्यंत दुर्मिळ आहे. हायपरट्रिकोसिस जन्मानंतर किंवा जन्मतः होऊ शकते. हायपरट्रिकोसिसचे अनेक प्रकार आहेत. जसे की,
हायपरट्रिकोसिस लॅनुगिनोसा
हायपरट्रिकोसिसची ही स्थिती जन्माच्या वेळी उद्भवते. यामध्ये बाळाच्या जन्माच्यावेळी त्याच्या शरीरावर बारीक केस दिसून येतात. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी हे केस झपाट्याने वाढू लागतात. ज्यामुळे त्यांना घनदाट केसांचा सामना करावा लागतो.
हायपरट्रिकोसिस टर्मिनलिस
हायपरट्रिकोसिसच्या या स्थितीत, केस जन्मापासूनच शरीरावर असामान्यपणे वाढू लागतात आणि आयुष्यभर ही वाढ कायम राहते. हे केस सहसा लांब आणि जाड असतात. या केसांमुळे व्यक्तीचा चेहरा आणि शरीर झाकला जातो.
नेव्हॉइड हायपरट्रिकोसिस
हायपरट्रिकोसिसच्या या स्थितीत शरीराच्या कोणत्याही भागात केसांचा ठिपका दिसू शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, केसांचे पॅच एकापेक्षा जास्त ठिकाणी असू शकतात.
हर्सुटिझम
हर्सुटिझम या प्रकारात विविध ठिकाणी केस उगवतात. ही स्थिती केवळ महिलांमध्येच आढळते. या स्थितीत महिलांच्या शरीराच्या ज्या भागात केस नसतात त्या भागात जास्त काळे केस येतात. जसे, चेहरा, छाती आणि पाठ.
एक्वायर्ड हायपरट्रिकोसिस
जन्माच्यावेळी उद्भवणाऱ्या हायपरट्रिकोसिसच्या विपरीत, हा आजार कोणत्याही वयात विकसित होऊ शकते. या स्थितीत, मखमलीसारखे केस शरीरावर लहान पॅचमध्ये दिसतात.
वेयरवोल्फवर उपचार
या आजारावर अद्याप कोणताही उपचार सापडला नाही. केस काढून टाकण्यासाठी तुम्ही शेविंग, केमिकल्स, वॅक्सिंग, प्लकिंग आणि हेअर ब्लीचींग यांसारख्या ट्रिटमेंटचा आधार घेऊ शकता. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय करू नका. याव्यतिरिक्त लेझर सर्जरी आणि इलेक्ट्रोलायसिस यांसारखे उपचार करू शकता.