वडिल आणि मुलीचे नाते किती खास असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आपल्या मुलीसाठी वडिल काय करतात याची कोणत्याच गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही. मुलगी कायम खूश असावी, तिचा प्रत्येक क्षण आनंदात जावा यासाठी वडिल जीवाचे रान करत असतात. याची प्रचिती नुकतीच आली. एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेल्या एका खास गोष्टीमुळे नेटीझन्सनी त्यांचे खूप कौतुक केले. राहुल वर्मा यांच्या मुलीला ऐन दिवाळीत डेंग्यू झाला. त्यामुळे तिला रुग्णालयात अॅडमिट होण्याची वेळ आली. आपली मुलगी दिवाळी अशी हॉस्पिटलमध्ये काढणार म्हणून या राहुल वर्मा यांचा जीव तुटत होता. मग त्यांनी एक आयडीया केली. हॉस्पिटलची रुमच दिवे आणि आकाशकंदील यांनी सजवली. त्यामुळे मुलीला हॉस्पिटलमध्येही दिवाळीचा फिल आला.
राहुल उदय फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी सजवलेल्या हॉस्पिटलच्या रुमचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीसाठी आणलेले फुगे, स्वीटस आणि चॉकलेटस यांचे फोटोही शेअर केले. मुलीला डेंग्यू झाला, त्यामुळे आम्ही हॉस्पिटललाच सजवले अशी कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिली आहे. यानंतर आणखी एका फोटोला ते म्हणतात, लक्षात ठेवा, लहान गोष्टींतील आनंद म्हणजेच सगळे आणि आम्ही चांगल्या विचारांवर प्रेम करतो. फोटोमध्ये हॉस्पिटलच्या खिडकीच्या काचेला लायटींगच्या माळा लावल्याचे दिसत आहे. तर एका फोटोमध्ये त्यांनी सरस्वती आणि गणपतीची मूर्ती ठेऊन त्यासमोर फुलांची सजावट केलेली दिसत आहे. त्यामुळे आनंद साजरा करायचा असेल आणि खडतर परिस्थातीत एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे असेल तर त्याला कसलेही बंधन नसते असेच या वडिलांना यातून सांगायचे नसेल ना...त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक, रिट्विट केले तर बाकी लोकांनी या मुलीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राहुल वर्मा यांचेही नोटीझन्सनी कौतुक केले आहे.