Join us  

नवरीसाठी कायपण, ट्रॅक्टरवर वरात पण! थेट ५१ ट्रॅक्टर घेऊन नवरदेव पोहोचला मंडपात, व्हिडिओ पाहून म्हणाल शाबास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 3:27 PM

पठ्ठ्याने कार किंवा बसने न येता थेट ट्रॅक्टरनेच घेतला लग्नमंडपात प्रवेश

ठळक मुद्देआतापर्यंत जवळपास २४ हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. विशेष म्हणजे नवरा मुलगा स्वत: ट्रॅक्टर चालवत असल्याचे या व्हिडिओच्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

लग्न हा आयुष्यातील असा एक सोहळा असतो जो आयुष्यभर लक्षात रहावा यासाठी प्रत्येक जण काही ना काही हटके करायचा प्रयत्न करत असतात. नव्या जीवनाला सुरुवात करताना ही सुरुवात काहीतरी खास असावी यासाठी नवरा-नवरी काही ना काही वेगळे करत असतात. कधी डोलीतून लग्नमंडपात येत तर कधी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेऊन नवरी आपल्या नव्या आयुष्यात पदार्पण करण्यासाठी सज्ज होते. तर नवराही आपल्या जीवनसाथीला घेऊन जाण्यासाठी काही ना काही खास आयोजन करतो. नुकताच एका नवरदेवाने आपल्या लग्नाला वरात घेऊन जाण्यासाठी फारच भन्नाट आयडीया शोधून काढली. आपल्या बायकोला घेऊन येण्यासाठी या नवरदेवाने थोडाथोडके नाही तर तब्बल ५१ ट्रॅक्टर आणले. 

(Image : Google)

सध्या सोशल मीडियामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचते. छायाचित्र किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गोष्टीचा घरबसल्या आस्वाद घेऊ शकतो. तसेच या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लग्नाची वरात म्हणजे एखादी कार किंवा फारतर बसमधून निघते. पण ही वरात म्हणजे थेट ट्रॅक्टरच होते, तेही ५१. वधूला तिच्या घरुन आणण्यासाठी मुलाने लढवलेली ही अनोखी शक्कल पाहून वधूच्या घरातील मंडळीही आश्चर्यचकीत झाली नसतील तरच नवल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि या लग्नाची सर्वत्र चर्चा व्हायला लागली. ही घटना राजस्थानमधील असून मुलाने पाठवलेल्या ट्रॅक्टरची मोठीच्या मोठी रांग व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळपास ३ मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरची रांग लागल्याचे दिसत आहे. 

अनेकदा आपण एखाद्या रस्त्यावर अशाप्रकारे ट्रॅक्टरची रांग पाहतो पण त्यावर कधी ऊस असतो तर कधी आणखी काही. पण वधूना नेण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग करणारा हा नवरदेवाचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. १ किलोमीटर लागलेली ही ट्रॅक्टरची रांग गावातील लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तर मुलाकडील सर्व मंडळीही या ट्रॅक्टरमधूनच लग्नमंडपात हजर झाली, या वऱ्हाडींची संख्या जवळपास १५० होती. विशेष म्हणजे नवरा मुलगा स्वत: ट्रॅक्टर चालवत असल्याचे या व्हिडिओच्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिकृतरित्या हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अशाप्रकारे शक्कल लढवणाऱ्या या नवरदेवाचे कौतुक होत आहे. तर आतापर्यंत जवळपास २४ हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्न