आजकाल आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या धातूंपासून तयार झालेली भांडी स्वयंपाक बनविण्यासाठी वापरतो. यात स्टील,अॅल्युमिनियम याबरोबरच लोखंडी तसेच तांब्या-पितळ्याची भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी स्टील आणि अॅल्युमिनियम व नॉन स्टीक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचा ट्रेंड आला आहे. लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजविणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जेव्हा आपण लोखंडी भांड्यात अन्न शिजवता तेव्हा ते धातुच्या पृष्ठभागावर प्रतिक्रिया करते. त्यातून असे घटक मिळतात जे आरोग्यासंबंधीच्या अनेक समस्या दूर ठेवतात. आरोग्यासाठी होणार्या फायद्यांव्यतिरिक्त बर्याच स्त्रिया लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यास देखील प्राधान्य देतात कारण लोखंडी भांड्यात कमी उष्णतेवर स्वयंपाक करणे सहज शक्य होते. म्हणून रोजच्या स्वयंपाकासाठी लोखंडी भांडी वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे.
लोखंडी भांड्यात स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत म्हटल्यावर आपण बाजारातून लोखंडी भांडे विकत आणतो. हे बाजारातून विकत आणलेले नवीन भांडे लगेच वापरायला काढण्यासाठी ते व्यवस्थित स्वच्छ करावे लागते. लोखंडी भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे अनेक असले तरी त्यांची काळजी देखील तितकीच घ्यावी लागते. लोखंडी भांडी वापरून झाल्यावर त्यांना व्यावस्थित स्वच्छ करणे, त्यांना गंज लागू नये म्हणून काळजी घेणे, वेळोवेळी त्यांना सिझन करणे यांसारख्या अनेक पद्धतींनी लोखंडी भांड्यांची काळजी घ्यावी लागते(How To Clean, Season, & Restore : Remove Rust From Cast Iron Pan In 5 Minutes).
बाजारातून नवीन विकत आणलेली लोखंडी भांडी स्वयंपाकयोग्य कशी करावीत ?
१. लोखंडी भांडी बाजारातून आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून ४ ते ५ वेळा घासणीने घासून घ्या. (हे सर्व करताना हँड ग्लोव्हस घालायला विसरू नका).
२. गरज वाटल्यास तांदळाच्या पाण्यात ५ ते ६ तास भिजवून ठेऊ शकता.
३. लोखंडी भांड धुवून - पुसून कोरड करुन घ्या.
४. नंतर गॅस वर कमी आचेवर ठेऊन त्या भांड्यावर लिंबू घासून घ्या. असे केल्याने सर्व काळपट ठार लवकर निघून जातो.
५. परत एकदा घासून स्वच्छ करा.नंतर पुसून घ्या.
६. लोखंडी भांड हाय फ्लेम वर ठेऊन गरम करुन घ्या, मग त्यामधे ५ ते ६ चमचे तेल आणि २ चिरलेले कांदे घालून भाजून घ्या.
७. तो कांदा आणि ते तेल मात्र स्वयंपाकात उपयोगाला आणायचे नाही कारण त्यात लोखंडाची खर असते. (वापरलेलं कांदा आणि तेल फेकून द्यावे.)
८. कांदा करपला की टिश्यूने तवा पुसून त्याला परत तेल लाऊन ठेऊन द्या.
९. असे १ ते २ दिवस करा.
लोखंडी भांड्यांवर गंज चढू नये ,म्हणून...
१. लोखंडी भांडी वापरुन झाली की धुवून कोरडी करुन लगेच तेल लाऊन ठेऊन द्या.
२. जर लोखंडी भांड्याना गंज आला असेल तर घासणीने घासून सगळा गंज काढून घ्या. गॅस वर गरम करुन त्याला तेल घालून १० मिनिटे गरम करुन घ्या. नंतर पुसून ठेऊन द्या.
३. लोखंडी भांडी चिंचेने स्वच्छ घासून घेऊन त्यानंतर परत एकदा माइल्ड साबणाच्या पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर ही भांडी अगदी कोरडी करून कापडाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्यानंतर तेलाचा हलका हात फिरवून ठेवून द्यावीत.
४. लोखंडी भांड व्हिनेगरमध्ये अर्धा - एक तास भिजवून ठेवा. यामुळे बराचसा गंज वस्तूपासून वेगळा होईल. जुन्या टूथब्रशने तो वेगळा झालेला गंज घासून काढून टाका.
५. १ टेबलस्पून बेकिंग सोडा घेऊन तो २ कप पाण्यात मिसळा. हे तयार झालेले मिश्रण गंज आलेल्या भागावर ५ मिनिटे लावून ठेवावे. यामुळे गंज निघण्यास मदत होते.