Join us  

किचन टॉवेल चिकट, कळकट, कडक झालेत? ६ सोप्या ट्रिक्स, टॉवेल होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 6:16 PM

Make crusty towels feel new again with this simple trick सततच्या वापरामुळे किचन टॉवेल लवकर खराब होतात, त्यातून काही केल्या डाग आणि दुर्गंधी निघून जात नाही..यासाठी ६ ट्रिक्स येतील कामी..

घरामध्ये लवकर घाण होणारी खोली म्हणजे किचन. किचनमध्ये दिवसातून तीन वेळा अन्न शिजवले जाते. जेवण बनवताना तेलाचे डाग, भाजीची वाफ या सगळ्यामुळे किचनच्या टाईल्स अथवा भिंतीवर चिकटपणा साचतो. बहुतेक लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी कापड वापरतात. स्वयंपाक करतानाही अनेकजण हात पुसण्यासाठी कापडाचा वापर करतात. त्यामुळे किचन टॉवेल लवकर काळा, चिकट आणि कडक होतो. धुतल्यानंतरही त्यातील उग्र वास निघून जात नाही. त्यावर अनेक प्रकारचे जंतू निर्माण होतात.

त्या टॉवेलवर तेल आणि मसाल्यांचे डाग पडतात. अशा परिस्थितीत, सामान्य पद्धतीने धुतल्यानंतर कापड पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्याचबरोबर टॉवेलमध्ये असलेले जंतू देखील तुमचे स्वयंपाकघर अस्वच्छ बनवतात. कधी कधी आपण तेच टॉवेल जेवणाचं ताट साफ करण्यासाठी वापरतो. टॉवेलमधील जंतू प्लेटमध्ये उतरतात व त्याच ताटात आपण जेवतो. याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होते. अशा परिस्थितीत किचन टॉवेल नीट साफ होणे महत्वाचं.

किचन टॉवेल साफ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक

गरम पाण्याची मदत घ्या

अस्वच्छ आणि चिकट टॉवेल स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. यासाठी सर्वप्रथम, स्वयंपाकघरातील कापड गरम पाणी आणि डिटर्जंटच्या मिश्रणात भिजत ठेवा. काही वेळानंतर टॉवेलला ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. याने टॉवेलमधील चिकटपणा निघून जाईल.

डिटर्जंटने साफ करा

किचन टॉवल साफ करण्यासाठी आपण हार्ड डिटर्जेंटचा वापर करू शकता. सर्वप्रथम हार्ड डिटर्जेंटमध्ये किचन टॉवल भिजत ठेवा. भिजवल्यामुळे त्यातील कडकपणा आणि उग्र वास निघून जाईल. टॉवल भिजल्यानंतर त्याला ब्रशने घासून घ्या. व सामान्य पाण्याने धुवून घ्या. आणि उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. यामुळे तुमचा टॉवेल स्वच्छ आणि जंतूमुक्त होईल.

सुती कापड वापरा

स्वयंपाकघरात सुती कापड वापरणे चांगले ठरते. कारण सिंथेटिक कपड्याच्या तुलनेत कॉटनचे कपडे कमी घाणेरडे होतात. त्याच वेळी, सुती कापड मायक्रोवेव्हमध्ये ठेवून, तुम्ही त्यातील बॅक्टेरिया नष्ट करू शकता.

स्टेन क्लिनरचा करा वापर

स्वयंपाकघरातील कापड स्वच्छ करण्यासाठी आपण स्टेन क्लिनरची मदत घेऊ शकता. यासाठी टॉवेल स्टेन क्लिनरमध्ये भिजत ठेवा. १५ मिनिटांनंतर कापड स्वच्छ पाण्याने धुवा व उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. याने किचन टॉवलमधील डाग निघून जातील.

लिक्विड ब्लीचने धुवा

ब्लीचच्या मदतीने आपण काही मिनिटांत स्वयंपाकघरातील टॉवेल स्वच्छ करू शकता. यासाठी लिक्विड ब्लीचमध्ये सोडियम बायकार्बोनेट मिसळून कापड भिजवा. काही वेळानंतर टॉवल स्वच्छ पाण्याने धुवा. याने टॉवेल पूर्णपणे स्वच्छ होईल.

कॉस्टिक सोडा वापरून पाहा

स्वयंपाकघरातील कापड मऊ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी आपण कॉस्टिक सोड्याचा वापर करून पाहू शकता. यासाठी अर्धा कप पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. आता या मिश्रणात किचन टॉवेल भिजवून ठेवा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे कापड डागमुक्त होईल.

टॅग्स :किचन टिप्सहोम रेमेडी